नवी मुंबईची पाण्याची तहान भागवण्यासाठी सिडकोचे धोरणात्मक जलनियोजन

नवी मुंबई :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना, यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन जलबोगदे व जलशुद्धीकरण केंद्रांच्या गुणवत्ता आणि प्रगतीवर देखरेख करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान आणण्याच्या दष्टीकोनातून नामांकित प्रकल्प व्यवस्थापन सल्लागांराची नियुक्ती करण्यात येत आहे. हेटवणे पाणी पुरवठा जलावर्धनाचे काम 2029 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सन 2050 पर्यंत सिडको आणि नैना क्षेत्रांमधील पाण्याची अंतिम मागणी 1275 एमएलडी इतकी प्रकल्पित आहे. ही मागणी पूर्ण करण्याकरिता सिडकोने व्यापक आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत हेटवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा), नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी या सध्या अस्तित्वात असलेल्या स्रोतांचा कमाल वापर करण्यासह बाळगंगा धरण व कोंढाणे धरण यांसारखे नवीन स्रोत निर्माण करण्याचा समावेश आहे.

सिडकोतर्फे प्रस्तावित करण्यात आलेला बहुप्रतीक्षित कोंढाणे धरण प्रकल्प हा सिडको प्रशासित क्षेत्रातील वेगाने विकसित होत असलेल्या भागांना पाणी पुरवठा करणारा महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे. कोंढाणे धरण हे उल्हास नदीवर मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. सुरूवातीस या धरणातून 250 एमएलडी पाणी पुरवठा होणार असून अंतिमत: तो 350 एमएलडी पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

बाळगंगा व कोंढाणे धरणांचे काम पूर्ण होण्यासाठी लागणारा अंदाजे 4-5 वर्षांचा कालावधी लक्षात घेता, सध्याची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हेटवणे धरण आणि मजीप्राच्या न्हावा-शेवा-टप्पा-3 या सध्या अस्तित्वात असलेल्या स्रोतांद्वारे अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर करण्याची विनंती सिडकोने केली आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये 119.80 कोटी रकमेच्या बदल्यात महाराष्ट्र शासनाने पाण्याचा अतिरिक्त 120 एमएलडी कोटा मंजूर केल्याने सिडकोला सद्यस्थितीत हेटवणे धरणातून 270 एमएलडी पाणी मिळत आहे. सदर अतिरिक्त 120 एमएलडी पाणी उपयोगात आणण्याकरिता आराखडा तयार करण्यासह सध्याच्या 270 एमएलडी पाणी पुरवठा प्रणालीचे आवर्धन करण्यासाठी सिडकोतर्फे तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.      

हेटवणे जलावर्धन योजना जून 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून योजना चाप टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्राचे 41%, प्रक्रिया न केलेल्या पाण्याच्या जलबोगद्याचे 8.5% व शुद्ध पाण्याच्या जलबोगद्याचे 25.7% काम पूर्ण झाले आहे.

कोंढाणे धरणाद्वारे नैना प्रकल्पाला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे हेटवणे पाणी पुरवठा जलावर्धन योजनेद्वारे सिडको अधिकारक्षेत्रासह पनवेल महापालिका क्षेत्राला सुरळीत पाणी पुरवठा होणे सुनिश्चित होणार आहे.

नवी मुंबईचा विकास आणि विस्तार सातत्याने होत असताना शाश्वत जलव्यवस्थापनप्रति असणारी आमची कटिबद्धता कायम आहे. वर्तमानातील तसेच भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी सक्षम असे पाणी पुरवठा पायाभूत सुविधांचे जाळे आम्ही विकसित करीत आहोत. - विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे नाका पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे बस्तान