दुर्गबांधणी स्पर्धेत निवड झालेल्या दुर्गांची अंतिम फेरीसाठी पाहणी
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘दुर्गोत्सव' उपक्रमामध्ये नवी मुंबईतून जास्तीत जास्त सहभाग असावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या दुर्गबांधणी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून शालेय गटात ३६ आणि खुल्या गटात २० अशाप्रकारे ५६ प्रवेशअर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्गबांधणी करणाऱ्या समुहांनी शासनाच्या दुर्गोत्सवात सहभागी होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रशस्तीपत्र प्राप्त करुन घेतले आहे.
दुर्गबांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या समुहांतून शालेय गटातून ८ आणि खुल्या गटातून ८ अशाप्रकारे एकूण १६ दुर्गांच्या प्रतिकृतींची निवड प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत करण्यात आलेली आहे. सुप्रसिध्द कलादिग्दर्शक तथा चर्नीरोड मुंबई येथील स्कुल ऑफ आर्ट महाविद्यालयाचे कला प्राध्यापक शिवम घोडजकर यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले आहे.
त्यामधून शालेय गटात रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न स्कुल-वाशी, नमुंमपा सेकंडरी स्कुल-घणसोली, नमुंमपा शाळा क्र.७१ इंदिरानगर, आयईएस नवी मुंबई हायस्कुल-वाशी, ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा-करावे, विवेकानंद संकुल हायस्कुल-सानपाडा, आयसीएल हायस्कुल-वाशी, नमुंमपा शाळा क्र.१०३ ऐरोली या ८ शाळांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सोसायट्या, वसाहती, संस्था यांच्या खुल्या गटातून श्लोक शिंदे आणि शिवांश शिंदे-ऐरोली, शंकरकृपा मित्र मंडळ-ऐरोली, अष्टविनायक सोसायटी-वाशी, एकविरा ग्रुप-दिघा, राजांची छोटी प्रजा-ऐरोली, टि्वन्स हॉलमार्क सहकारी गृहसंस्था- कोपरखैरणे, सत्यम असोसिएशन-बेलापूर, सिंहसेना-सानपाडा या ८ दुर्ग प्रतिकृती बनविणाऱ्या समुहांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे.
शासनाने ‘दुर्गोत्सव' या अभिनव उपक्रमांतर्गत युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग या १२ दुर्गांपैकी एका दुर्गाची प्रतिकृती बनवून ‘दुर्गोत्सव-२०२५'च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचे सूचित केले होते. या माध्यमातून दिवाळी सण साजरा करताना किल्ले बनविण्याची आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, समुहांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत ५६ सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करीत प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या १६ स्पर्धकांच्या दुर्ग प्रतिकृतींची २ दिवसात अंतिम फेरीसाठी पाहणी करण्यात येऊन त्यामधील प्रत्येक गटात ६ अशा १२ स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.