कल्याण बाजार सभापती पदी रवींद्र घोडविंदे, उपसभापती पदी जालिंदर पाटील बिनविरोध
कल्याण : ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीे'च्या सभापती पदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापती पदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदावर शिक्कामोर्तब करीत ‘भाजपा'ने ‘बाजार समिती'वर झेंडा फडकवला.
‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या १८ संचालक पदाच्या जागांसाठी आठवडाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत ‘महायुती'च्या भाजपा-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकहाती सत्ता काबीज करीत सर्वाधिक १६ जागा पटकावल्याने ‘महायुती'ने ‘बाजार समिती'वर वरचष्मा मिळवला आहे. बाजार समिती निवडणुकीत भाजपा आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचे दाखवून देत शेतकरी पतसंस्था आणि ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्याने ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'वर आपले वर्चस्व दाखवून दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्फत सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी रवींद्र घोडविंदे आणि उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सभापती रवींद्र घोडविंडे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली आहे. घोडविंदे आ. किसन कथोरे यांचे खंदे समर्थक असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार कथोरे देखील उपस्थित राहिले होते. उपसभापती जालिंदर पाटील यापूर्वी २ टर्म ‘कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या संचालक मंडळावर निवडून आले होते. यंदा ते तिसऱ्यांदा बाजार समिती संचालक पदी निवडून आले आहेत.