अखेर डोंगरी गावातील मेट्रो कारशेड रद्द

भाईंदर : दहिसर - मिरा-भाईंदर मेट्रो ९ या प्रकल्पासाठी भाईंदर पश्चिमेकडील उत्तन भागातील डोंगरी गावामधील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतला आहे. या भागातील भूमीपुत्र आणि पर्यावरणप्रेमींनी आंदोलन करत तीव्र विरोध दर्शविला होता.

मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तनमध्ये सदर प्रकल्प उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल करावी लागणार होती. त्यास स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला होता. त्याची दखल घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर-दहिसर मेट्रो ९ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-अंधेरी मेट्रो ७ अ प्रकल्पांसाठी भाईंदरच्या राई गावात प्रथम मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाल्याने सदर प्रकल्प उत्तनच्या डोंगरी गावातील शासकीय भूखंडावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संबंधित जागेचा ताबाही घेण्यात आला होता. या जागेवर सुमारे ११,३०० हून अधिक विविध प्रजातीची झाडे अडथळा ठरणार असल्याने त्यावर कुऱ्हाड चालवली जाणार होती. त्यासाठी आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली होती.

परिणामी, उत्तन भागातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत वृक्षतोडीला तीव्र विरोध करण्यात आला. त्याची दखल घेऊन, प्रस्तावित उत्तन येथील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे ना. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो आता उत्तनपर्यंत न जाता सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत होणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे