‘महाराष्ट्र फ्युचर टेक समीट'मध्ये आयुक्त डॉ. शिंदे यांंचे सादरीकरण
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पयुचर टेक समीट-२०२५'मध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा महापालिकेच्या कामकाजात प्रभावी वापर' या विषयावर सादरीकरण करण्याचा बहुमान मिळाला. यामध्ये आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये झालेल्या सकारात्मक बाबींविषयी माहितीपूर्ण सादरीकरण केले. या प्रभावी सादरीकरणात त्यांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्धतेचा कालावधी कमी झाला आहे, त्यासोबतच कामात गतीमानता आणि पारदर्शकता आल्याने नागरिकांच्या प्रशासनावरील विश्वासात वाढ झाली असल्याचे सांगितले.
सदर परिषदेत एआय तंत्रज्ञान, ड्रोन टेक्नॉलॉजी, आयओटी, ब्लॉकचेन अशा विविध अत्याधुनिक तंत्रप्रणालीबाबत माहितीपूर्ण चर्चा करण्यात आली. शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इकोनॉमिक टाईम्स प्रसार माध्यमाच्या सहयोगाने आयोजित ‘महाराष्ट्र पयुचर टेक समीट-२०२५' प्रसंगी माहितातंत्रज्ञान मंत्री ना. आशिष शेलार, प्रधान सचिव पराग जैन नैनुतिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्या झपाटयाने प्रगत होत असलेल्या तंत्रस्नेही युगात विदा सुरक्षितता (Data Security) हे मोठे आव्हान असल्याचे सांगत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विविध माध्यमांतून संकलित झालेला डाटा एकत्रित करणे व कृत्रिम बुध्दीमतेचा (Artificial Inteligance) वापर करुन कामात अधिक सुलभता आणणे यादृष्टीने ‘एआय'चा वापर मोठी संधी आहे, तसेच आव्हानही आहे, असे मत मांडले.
नवी मुंबईच्या कामकाजात सद्यस्थितीत उद्यान आणि रस्ते या सुविधांवर दक्ष ॲपच्या माध्यमातून सुनियोजित नियंत्रण ठेवले जात असताना त्यामध्ये ‘एआय'च्या वापरामुळे अधिक गतीमानता आणि अचूकता येत असल्याचे ते म्हणाले. ‘केपीआय'चा वापर केल्याने कामाचे प्रतिसादात्मक अभिप्राय प्राप्त होऊन त्याद्वारे कार्यक्षमतेची माहिती मिळते, असेही त्यांनी सांगितले. शहरातील मालमत्तांचे लिडार प्रणालीव्दारे जीआय बेस्ड सर्वेक्षण केल्याने सखोल माहिती प्राप्त झाली असल्याने कार्यक्षमतेत वाढ होण्यासोबतच जबाबदारीही वाढणार असल्याचे आयुवत शिंदे यांनी सांगितले.
स्वच्छतेमध्ये देशात मानांकित शहर असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागातही अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येत असून कचरा संकलनावर अचूक नियंत्रण ठेवण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड आणि नियंत्रण प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. कचरा संकलन वाहनांचे दररोज रिअल टाईम ट्रॅकिंग होत असल्याने तसेच वाहनांवर जिओ टॅगींग असल्याने सदर वाहनांनी कचरा कोणत्या वेळी आणि कुठून संकलित केला. तो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी किती वेळात वाहून नेण्यात आला अशा सर्व बाबींवर निरीक्षण आणि नियंत्रण ठेवले जात आहेत. कचरा संकलन करण्याच्या बिन्स आणि बॅग्स या बारकोडेड आहेत. त्यामुळे कोणत्या बिन्समधून कचरा संकलित करण्यात आला यावरही लक्ष ठेवणे सुलभ झाले आहे.अशाचप्रकारे पाणी पुरवठा व्यवस्थापनातही स्काडा प्रणालीचा वापर करुन जलव्यवस्थापनावर बारकाईने निरीक्षण-नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहेत.
अशाप्रकारे दैनंदिन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने नवी मुंबई महापालिकेचे कामकाज अधिक गतीमान आणि सुनियोजित झाले असल्याची माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिली.
‘नमुंमपा'च्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या समवेत मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहा. आयुक्त प्रबोधन मवाडे सदर परिषदेस उपस्थित होते. माहिती-तंत्रज्ञान विषयक या राज्यस्तरीय महत्वाच्या परिषदमध्ये ‘नमुंमपा'ला सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध होणे, बहुमानाची गोष्ट आहे.