वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेचा बडगा

खारघर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर खारघर वाहतूक शाखेने कारवाईचा दंडुका उगारला आहे. १ ते २० जुलै या अवघ्या २० दिवसात ३ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

खारघर शहराचा विकास आणि वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. बहुतांश कुटुंबियांकडे एकापेक्षा अधिक वाहने आहेत. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे किरकोळ अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी खारघर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. खारघर वाहतूक शाखेचे तत्कालीन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी ते २५ एप्रिल दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या १२ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून १० लाख ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, १ जुलैपासून नव्याने दाखल झालेले जमाल शेख यांची खारघर वाहतूक पोलीस शाखेत वर्णी लागताच गेल्या   २० दिवसात वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे, सिग्नल तोडणे, दुचाकीवरुन तिघेजण प्रवास करणारे, विना हेल्मेट , सुरक्षा बेल्ट परिधान न करणे तसेच सर्कल चौकात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा ३ हजार  बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रिक्षा चालकांच्या दादागिरीला चाप...
खारघर परिसरात ३ हजाराहून अधिक रिक्षा धावतात. खारघर रेल्वे स्थानकावर बेशिस्तपणे रिक्षा उभी करुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये नियमितपणे वाद सुरु असतात. खारघर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्तपणे रिक्षा उभी करुन प्रवासी घेवून जाणे, प्रवासी बरोबर गैरवर्तणूक करणे, विना परवाना आणि विनागणवेश विना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे.

दंड वसुली करण्यासह वाहतूक कोंडीकडे लक्ष द्या...
खारघर मधील उत्सव चौक ते बेलपाडा दरम्यान रस्त्याचा दोन्ही बाजुला गॅरेज व्यवसायिकांनी कब्जा करुन वाहने दुरुस्ती करीत असतात. तसेच बेलपाडा येथे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रस्त्यावरच वाहने उभी करुन वाहतूक कोंडी करीत असतात. तसेच डेली बाजार कडून शिल्प चौक आणि शिल्प चौक कडून गोखले शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांकडून दंड वसुली करताना वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खारघर वाशियांकडून केली जात आहे.

गेल्या काही वर्षात वाहन अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहुतक विभाग प्रयत्नशील असतो. खारघर मध्ये वाढत्या विकासामुळे लोकसंख्या आणि वाहनांमध्ये भर पडत आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करुन वाहतूक विभागाला सहकार्य करावे.  
- तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त-वाहतूक विभाग, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर ‘रिपब्लिकन सेना'चे उपोषण मागे