महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
घंटागाडीवरील नाका कामगारांना मस्टरवर घेण्याची मागणी
नवी मुंबई : घंटागाडीवर गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या नाका कामगारांना मस्टरवर घेऊन त्यांना अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने नवीन काढण्यात आलेल्या निविदामध्ये सदर नाका कामगारांना सामावून घ्यावे आणि त्यांना अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणे सेवेत सर्व सुविधा आणि वेतन देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. त्याअनुषंगाने ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पवार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त वारुळे (परिमंडळ-२), डॉ. अजय गडदे (परिमंडळ-१)यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने नाका कामगारांच्या समस्येचे गांभीर्य, असुविधा याची माहिती देताना या कामगारांना नवीन निविदामध्ये कंत्राटी कामगारांप्रमाणे समाविष्ट करुन घ्यावे. तसेच त्यांना वेतन आणि सुविधा देण्याची मागणी केली.
या शिष्टमंडळात ‘युनियन'च्या वतीने सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी विभाग अध्यक्ष संजय सुतार, घनकचरा विभाग अध्यक्ष रविकुमार राठोड, बापुराव चव्हाण, निलेश घाडगे, रविकांत राठोड, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यन, ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी नाका कामगारांबाबत चर्चा केली असून महापालिका प्रशासन यावे लवकरच तोडगा काढेल आणि नाका कामगारांच्या समस्यांचे निवारण होईल, असा आशावाद कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे.