नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे?
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरुन गेली अनेक वर्षे राजकारण सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यावरुन नेहमी आश्वासन मिळत आहे. पण, कार्यवाही मात्र शून्य आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विकास परशुराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणास विलंब होत असल्यामुळे ‘प्रकाशझोत सामाजिक संस्था' मार्फत विकास परशुराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरु असून, या लढ्याला राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे.विशेष म्हणजे राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होऊनही नामकरणाचा प्रश्न ‘जैसे थे' आहे. प्रकल्पग्रस्त हवालदिल झाल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्यालढ्याला कायदेशीर दर्जा प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने विकास पाटील यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.विमानतळाला ‘दिबां'चे नाव द्यायचे ठरले असेल तर त्याबाबतचा पत्रव्यवहार न्यायालयात सादर करणे अनिवार्य आहे. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने सदर प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण लढ्याला आता कायदेशीर स्वरुप प्राप्त झाल्याने या नामकरणाचा लढा अधिकच तीव्र झाला असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकर देण्यात यावे, अशी मागणी अधिकच तीव्र झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण वरुन राजकारण तापले असून, याबाबत केंद्र सरकारची नेमकी भूमिका लवकरच केंद्र सरकारला स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, लोकनेते दि.बा. पाटील यांचे समर्थक यांच्या नजरा केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.