रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी होणार का?
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली मध्ये एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. त्यात गटारबांधणीची कामे चालू असताना आता सेवा वाहिन्यांच्या कामांची देखील भर पडणार आहे. काँक्रीटीकरणाची कामे पावसाळयापूर्वी मार्गी लावण्याचे लक्ष ‘केडीएमसी'ने ठेवले असले तरी पावसाळयापूर्वी कामे पूर्ण होतील का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
डोंबिवली मध्ये गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. आगामी पावसाळा पाहता सध्या कामांना वेग आला आहे. सदर कामे एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून सुरु असून या कामाची देखरेख केडीएमसी करीत आहे. रस्त्यांच्या सुरु असलेल्या विकास कामामुळे नागरिकांना काही ठिकाणी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत असून वळसा घालून वाहनांना जावे लागत आहे. आता अवघ्या अडीच महिन्याच्या कालावधीत पावसाळा सुरु होणार आहे. यामुळे प्रशासनाने नियोजन तसेच समन्वय साधत पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला गती देत रस्त्याची विकास कामे मार्गी लावली पाहिजेत, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु पाहत आहे.
‘केडीएमसी'चे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दोन दिवसापूर्वी एमएमआरडीए आधिकारी आणि केडीएमसी अधिकारी यांच्या समवेत संयुक्त पाहणी करीत रस्त्याच्या आढावा घेतला असून पावसाळ्यापूर्वी सुरु असलेली रस्त्यांची विकास कामे मार्गी लावण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची प्रतिक्रिया प्रसिध्दी माध्यमांना यानिमित्ताने दिली.