नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटचाईची गंभीर समस्या
पनवेल : पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पाण्याचा पुनर्वापर असा नाविन्यपूर्ण पर्याय पुढे आणला आहे. सध्या ‘सिडको'च्या वसाहतीतील रहिवाशांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ‘सिडको'ने बांधून विक्री केलेली घरे सध्याच्या बाजारभावाने परत घ्यावीत, अशी आर्जवी मागणी केली असताना पनवेल महापालिकेने ‘प्रक्रिया केलेल्या पुनर्वापर पाणी वापरा' या संकल्पनेवर आधारित दीर्घकालीन उपाययोजना आखली आहे.
महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी पनवेल महापालिकेत भेटीस आले. या बैठकीत आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पुनर्वापर या प्रकल्पांची सविस्तर माहिती सादर केली.
सध्या पनवेल महापालिका क्षेत्राला २५८ एमएलडी पाण्याची गरज असली तरी सुमारे २९ एमएलडी पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागतो. भविष्यातील विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन शासनाने शिलार धरण प्रकल्पाची आखणी केली आहे. मात्र, सुमारे ३६७२ कोटी रुपयांचा सदर प्रकल्प पूर्ण व्हायला किमान १० वर्षांचा कालावधी लागेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तातडीच्या उपाययोजनेत महापालिकेने २ स्वतंत्र प्रकल्पांचे नियोजन केले आहे. पहिल्या प्रकल्पात देहरंग धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाचवून ‘सिडको'च्या वसाहतींसह नागरिकांना पुरवठा करण्यासाठी १४९ कोटी रुपयांचा जलवाहिनी प्रकल्प सादर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकल्पात पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतून तृतीयक शुध्दीकरणानंतर मिळणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.
दरम्यान, कळंबोली आणि खारघर येथील मलनिःस्सारण वाहिन्या पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असल्या तरी संबंधित केंद्रांचे हस्तांतरण ‘सिडको'ने अद्याप केलेले नाही. त्यामुळे देखभाल जबाबदारी २ वेगवेगळ्या यंत्रणांकडे असल्याने समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिडको मलनिस्सारण केंद्रांचे हस्तांतरण नेमके कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकल्पातील पाणी स्वच्छतागृह, बागा, रस्ते स्वच्छता तसेच औद्योगिक वापरासाठी वापरले जाईल. या प्रकल्पाचा खर्च सुमारे ३५० कोटी रुपये अपेक्षित आहे. पनवेलमधील सध्याच्या आणि भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करुन महापालिकेने पाणीपुरवठा सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कामोठे आणि पनवेल येथील मलनिस्सारण केंद्रात तृतीयक शुध्दीकरण प्रकल्प राबवल्यास २० एमएलडी पुनर्वापरयोग्य पाणी उपलब्ध होईल, ज्याचा वापर स्वच्छतागृह, सर्व्हिस स्टेशन आणि बागांमध्ये करता येईल. सदर प्रकल्प हस्तांतरीत झालेल्या आणि भविष्यात हस्तांतरीत होणाऱ्या सर्व मलनिःस्सारण केंद्रांमध्ये कार्यान्वित झाल्यास १७० एमएलडी पाणी उपलब्ध होईल. ते मोठ्या गृहनिर्माण संस्था, औद्योगिक क्षेत्रातही वापरता येईल. सदरचा प्रस्ताव ‘मित्रा' संस्थामार्फत शासनाकडे पाठवण्यात येणार असून पुढील निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल.