सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाचा परित्याग करुन महिला झाली फरार  

फरार आईचा वाशी रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु  

नवी मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱया एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधुन उतरता येणार नसल्याचा बहाणा करत आपल्या 15 दिवसाच्या बाळाला एका तरुणीकडे सोपवून स्वत लोकलमधून न उतरता सदर लोकलमधून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड्स रेल्वे स्थानकात घडला. वाशी रेल्वे पोलिसांनी 15 दिवसाच्या बाळाला सोडुन पळुन गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.  

मुंबईत राहणारी दिव्या नायडू (19) हि तरुणी सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भूमिका माने या मैत्रिणीसह सीएसएमटी येथून जुईनगर येथे जाण्यासाठी लोकल पकडली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सानपाडा स्थानक ओलांडल्यावर दोघी जुईनगर स्थानकावर उतरण्यासाठी लोकलच्या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्याच डब्यामध्ये 15 दिवसाच्या बाळाला व तीन बॅगा घेऊन बसलेल्या 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी महिलेने दिव्या आणि भूमिकाला, ती सीवूडस रेल्वे स्थानकात उतरणार असल्याचे सांगितले. तसेच तिच्याकडे असलेल्या सामानामुळे तिला बाळासह लोकलमधुन उतरता येणार नसल्याने त्या दोघींना तिच्यासोबत सीवूड्स रेल्वे स्थानकापर्यंत येण्यास विनंती केली.

त्यामुळे दिव्या आणि भूमिका या दोघी सदर महिलेला मदत करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत सीवूड्स रेल्वे स्थानकापर्यंत गेल्या. यावेळी दिव्या आणि भूमिका या दोघी सिवूड स्थानकावर बाळासह खाली उतरल्या. मात्र सदर महिला लोकलमधुन न उतरता त्यांच्याकडे पाहत त्याच लोकलने ती पुढे निघून गेली. सदर महिला परत येईल असा विचार करुन दिव्या आणि भुमिका या दोघी रेल्वे स्थानकात सदर महिलेची वाट पाहत बसल्या. मात्र बराच वेळ उलटुन गेल्यानंतर देखील सदर महिला न आल्याने या दोघींनी बाळासह जुईनगर येथील भूमिकाच्या घरी जाऊन बाळाची काळजी घेतली. त्यानंतर नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली.  

त्यानुसार 15 दिवसाच्या बाळाला सोडून देणाऱया अज्ञात महिलेविरोधात बीएनएस कलम 93 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन सदर महिलेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंड्रे यांनी दिली. बाळाला सद्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सदर बाळाला सोडून पळुन गेलेल्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन देखील उंड्रे यांनी केले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटरला खारघरवासियांचा विरोध