ऐरोली मध्ये सफाई कामगारांच्या नोंदीत हेराफेरी?
वाशी : ‘आपण राज्यातील उच्च पदस्थ नेत्याचा माणूस आहे. त्यामुळे आपण नवी मुंबई महापालिका मध्ये कितीही अपहार केला तरी माझे काहीच वाकडे होणार नाही', अशी मुजोरी दाखवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न केल्यास त्याच नेत्याचे मुखवटे घालून आणि
मुजोरी करण्याचे फलक हातात घेऊन काम करण्यात येईल, असा इशारा ‘समाज समता संघटना'चे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिला आहे.
नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील ऐरोली मधील एका गटात ५२ सफाई कामगारांपैकी फक्त १५ ते २० कामगारच कामावर येत आहेत. उर्वरित कामगारांपैकी १५कामगार निम्म्या पगारावर ठेकेदाराने घरी बसवले आहेत. ५२ पैकी १० कामगारांना पर्यवेक्षक बनवून स्वतःच्या खाजगी साईटची काम करुन घेत आहे. तर ३ कामगार ठेकेदाराच्या घरी कामासाठी ठेवले आहेत. महत्वाचे म्हणजे मागील ५ वर्षे ठेकेदार स्वतःच्या बायकोचे नाव सफाई कामगार दाखवून बायकोच्या नावाने महापालिकेकडून पैसे लुबाडत होता. याच तथाकथित ठेकेदारास रबाळे रेल्वे स्टेशनचे काम मिळाले असून, त्या ठिकाणची कामे जोर जबरदस्तीने महापालिकेच्या कामगारांकडून करुन घेतली जात आहेत. याबाबत तक्रार केली असता महापालिका आयुक्त माझे काहीच करु शकणार नाहीत कारण माझे राज्यातील उच्च पदस्थ नेत्याशी घनिष्ट संबंध आहेत, अशी बतावणी करुन वारंवार कामगारांना धमकावले जात आहे, असा आरोप मंगेश लाड यांनी केला आहे.
सदर ठेकेदाराबाबत ६ मे २०२५ रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊनही कारवाई न झाल्यामुळे ठेकेदार मोकाट सुटला आहे. त्यामुळे या तथाकथित ठेकेदारावर तत्काल कारवाई करावी, सर्व कामगारांना त्यांच्या बीट प्रमाणे काम नेमुन द्यावे, कामावर न येणाऱ्या कामगारांची गैरहजेरी लावावी, आतापर्यंत ठेकेदाराने महापालिकेकडून लुबाडलेल्या पैशांची वसूली करावी आणि ठेकेदारावर महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या करुन, मागण्या मान्य न झाल्यास या तथाकथित ठेकेदाराचे घनिष्ट संबंध असलेल्या राजकीय नेत्याचे मुखवटे आणि फलक घालून कामगार साईट वर काम करणार आहेत, असा इशारा मंगेश लाड यांनी दिला आहे.