खारघरमध्ये चायनीजचे दुकान जळून खाक

नवी मुंबई : खारघर रेल्वे स्टेशन समोर सेक्टर-1 येथील सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या एका चायनीज दुकानाला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील आग तासाभरात अटोक्यात आणली. सुदैवाने दुकानात कोणीही नसल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र दुकानातील संपुर्ण सामान जळुन खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  

मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास खारघर रेल्वे स्टेशन समोर सेक्टर-1 येथील सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या एका चायनीज दुकानाला अचानक आग लागली. याबाबतची माहिती मिळताच खारघर येथील सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवानांनी दुकानाचे शटर उघडून शोरमा मशीनमध्ये पेटलेला एलपीजी गॅस सिलेंडर बाहेर काढून आग विझवली. तसेच दुकानातील इतर वस्तूंना लागलेली आगही पूर्णपणे विझवण्यात आली.  

यावेळी अग्निशमन दलाच्या जवांनानी सदर दुकानात असलेले दोन भरलेले आणि दोन रिकामे असे एकूण चार एलपीजी सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे 9:20 वाजता अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील आग पुर्णपणे विझवुन ती आटोक्यात आणली. खारघर अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी सौरभ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, यंत्रचालक आर. एल. बंडा, फायरमन संभाजी पाटील, गणेश भोईर, एन. जे. मढवी आणि बी. व्ही. भोसले यांनी ही आग आटोक्यात आणली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अग्निशामक शुभांगी घुले यांचा आयुक्त चितळे यांच्या हस्ते सत्कार