‘ठामपा'ची ३० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

९ प्रभाग समिती क्षेत्रात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात स्वतंत्र पथक

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण, पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण ३० अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. तसेच लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकाम प्रकरणी एमआरटीपीअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला.

उच्च न्यायालयाने दिलेले निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसेच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सहाय्यक पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी, आदिंचा समावेश आहे.

येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा-मानपाडा येथे सदर कारवाई करण्यात आली. दिवा येथील १७ इमारतींपैकी आणखी २ इमारती पाडण्यात आल्या. त्यामुळे याठिकाणी एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या १३ झाली आहे. कारवाईवेळी तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुवत शंकर पाटोळे यांनी सांगितले. दिवा येथील कारवाईवेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे, आदि उपस्थित होते.

यापूर्वी सदर मोहिमेत ३३ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात आणखी ३० बांधकामांची भर पडली आहे. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात सदर कारवाई करण्यात आली.

पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अव्याप्त इमारती, बांधकाम सुरु असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणी, प्लिंथचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरुच राहणार आहे.
-शंकर पाटोळे, उपायुक्त-अतिक्रमण विभाग, ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा भाडेवाढ लागू