नवी मुंबई मध्ये ‘खाद्यपदार्थ वाळवण संस्कृती' आजही कायम
वाशी : नवी मुंबई शहर आधुनिकतेची कास धरत असताना नवी मुंबई शहरात सर्व काही चुटकीसरशी उपलब्ध होत आहे. मात्र, नवी मुंबई शहर वसण्याआधी येथे शेती होती. त्यामुळे मान्सूनपूर्व येथील गावकरी पावसाळ्यातील खाद्यपदार्थांची गरज म्हणून सुकी मासळी, मसाला तसेच पापड, लोणचे भरुन ठेवत असत. आज जरी शेती नसली तरी नवी मुंबई शहरातील बहुतांश नागरिकांच्या सवयी मात्र आजही कायम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरातील गाव-गावठाणात आजही मोठ्या प्रमाणात वाळवण केले जात आहे,
उन्हाळा म्हटल्यावर गावोगावी घराघरांमध्ये वाळवणाच्या पदार्थांचा घाट घातला जातो. त्यात पापड, कुरडया, वडे, मिरच्या, शेवया, फणस गरे आदी विविध पदार्थांचा समावेश असतो. सदर पदार्थ पावसाळा भराची बेगमी असतात. या बेगमीसाठी घरातल्या महिला तर झटत असतात. त्यात मुले-मुलींचाही समावेश असतो. संपूर्ण घरच जणू काही या बेगमीच्या तयारीला लागते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिल महिन्याची सुरुवात झाल्यावरपापड, कुरडया, बटाटयाचा कीस, सांडगे वडे, काय काय करायचे?, कोणते कोणते पापड कधी करायचे?, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो,
आजही कित्येकांच्या घरी उन्हाळ्यात वाळवणाचा कार्यक्रमाचा बेत आखला जातो. गावाकडून नवी मुंबई शहरात स्थायिक झालेल्या स्त्रियादेखील वर्षभराच्या बेगमीसाठी दरवर्षी आठवडाभराची रजाही घेतात. आजकाल नवी मुंबई सारख्या काँक्रिटच्या जंगलात घरातील अंगण शाबूत नसले तरी अशी वाळवणे घरांच्या गच्चीत, छतावर करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
नवी मुंबई परिसरात उन्हाळा सुरु झाल्यावर घरोघरी वाळवणाचे बेत आखले जातात. मात्र, आता घरासमोर अंगण नसल्याने गच्चीत किंवा छतावर पापड, पापड्या, कुरडया सुकवल्या जातात. पूर्वी पापड, पापड्या, कुरडया एकत्रितपणे बनवले जात होते. पूर्वी ५ ते ६ किलो एवढे वाळवण बनविले जात होते. मात्र, आता जागेअभावी एक-दोन किलो वाळवण आवर्जून बनविले जाते.- शर्मिला पाटील, गृहिणी - घणसोली गाव.