दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण
नवी मुंबई : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awarness Week) साजरा करण्यात येत आहे.
दक्षता आपली सामायिक जबाबदारी (Vigilance: Our Shared Responsibility) या संकल्पनेनुसार ‘दक्षता जनजागृती सप्ताह' साजरा करण्यात येत असून नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या समवेत विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयातील ॲम्पीथिएटर येथे ‘भ्रष्टाचार निमर्ुलन'ची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली.
यावेळी उपायुक्त किसनराव पलांडे, डॉ. कैलास गायकवाड, संघरत्ना खिल्लारे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता सुधीर जांभवडेकर, प्रवीण गाडे, विवेक मुळ्ये, शंकर जाधव, विधी अधिकारी सहा.आयुक्त स्वरुपा परळीकर, अलका महापूरकर, शिल्पा देशपांडे, दिपाली दिवेकर, अरुण पाटील तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी ‘महाराष्ट्र'चे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त शुभेच्छा संदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी वाचून दाखविला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे प्रशासन विभाग उपायुक्त किसनराव पलांडे यांनी वाचन केले.
‘आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार असा प्रमुख अडथळा आहे. ‘भ्रष्टाचार निर्मुलन'साठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष रहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे याची मला जाणीव आहे. म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन, व्यवतीगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन' अशा शब्दांतील सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.
अशाप्रकारे महापालिकेच्या विभाग कार्यालयांसह इतरही कार्यालयांमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. तसेच जनजागृतीसाठी सर्व ठिकाणी माहितीप्रद फलकही प्रदर्शित करण्यात आले आहेत.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    