सिलेंडर मधील गॅसची चोरी; चौकडी जेरबंद  

उरण : व्यावसायिक गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशीररित्या आणि असुरक्षित रित्या नोझल पाईपद्वारे रिकाम्या सिलेंडर मध्ये भरुन सदर गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चौकडीला उरण पोलिसांनी द्रोणागिरी, सेक्टर-५० येथे छापा मारुन अटक केली आहे. या चौकडीने मागील अनेक महिन्यांपासून गॅस चोरीचा धंदा सुरु केल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईत पोलिसांनी व्यावसायिक आणि घरगुती वापराचे भरलेले तसेच रिकामे गॅस सिलेंडर, टेम्पो, महिंद्रा बोलेरो जिप, कंटेनर असा मुद्देमाल जप्त केला आहे.  

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये बालाजी धोंडीबा साळवी (४०), मनोहर गणेश गोंड (३६), सुरेशकुमार सखाराम माजरा (३०) आणि रुस्तुम बाळाजी घरजाळे (४९) या चौघांचा समावेश आहे. सदर चौघेही भारत गॅस एजन्सीमध्ये काम करत होते. गॅस सिलेंडरची सर्व जबाबदारी या चौघांवर असल्याने ते ग्राहकांना वितरीत करण्यासाठी येणाऱ्या व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर मधील २ ते ३ किलो गॅस, नोझल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या सिलेंडरमध्ये भरुन नंतर सदर गॅस सिलेंडर गैरमार्गाने काळ्या बाजारात विकत होते.  

त्यानंतर ज्या घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरले जात होते, त्या गॅस सिलेंडरला डुप्लिकेट सील लावून सदर सिलेंडर देखील ते व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना देत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या सर्वांचा गॅस चोरीचा धंदा सुरु होता. १८ ऑवटोबर रोजी दुपारी देखील सदर चौघेजण द्रोणागिरी, सेक्टर-५० मध्ये टाटा टेम्पो, दोन महिंद्रा बोलेरो जिप एक २० फुटी कंटनेर उभा करुन त्यात असलेल्या व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस, नोझल पाईपच्या सहाय्याने चोरुन रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या आणि असुरक्षितपणे भरत होते.  

उरण पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी सदर आरोपी व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ूÀन गॅस काढून सदरचा गॅस इतर रिकाम्या सिलेंडर मध्ये भरत असताना रंगेहाथ सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्यामुळे पोलिसांनी बालाजी साळवी, मनोहर गोंड, सुरेशकुमार माजरा आणि रुस्तुम घरजाळे या चौघांना ताब्यात घेतले.  

या कारवाईत टाटा टेम्पो, २ बोलेरो जिप, २० फुटी कंटेनर तसेच १७९ आणि ६० (५ किलो) भरलेले सिलेंडर, तसेच १४६ रिकामे सिलेंडर असे एकूण ३७५ व्यावसायीक आणि घरगुती गॅस सिलेंडर त्याचप्रमाणे गॅसची चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे नोझल पाईप आणि वजनकाटा असा एकूण २४ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात फसवणुकिसह जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-हनिफ मुलाणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-उरण पोलीस ठाणे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मार्केट बाहेरील दुकानदारांकडून सामासिक जागेचा गैरवापर