इटीसी केंद्रामध्ये दिव्यांग मुलांसमवेत आयुक्तांनी केली दिवाळी साजरी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांग मुलांना सर्व सामाजिक सोहळे, आपल्या परंपरा, संस्कृती यांची माहिती व्हावी या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग मुलांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.
विशेष म्हणजे यावेळी या दिव्यांग मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे उपस्थित राहिल्याने दिव्यांग मुलांचा आनंद द्विगुणित झाला. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस त्यामुळे ईटीसी केंद्रामध्ये आयुक्तांच्या हस्ते गोमातेची प्रतिकात्मक पूजा करण्यात आली.
दिवाळीनिमीत्त संपूर्ण केंद्रात रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. मुलांनी बनवलेले आकाश कंदिल, पणत्यांची आरास याने केंद्र सुशोभित करण्यात आले होते. यावेळी मोठया संख्येने दिव्यांग मुले त्यांच्या पालकांसह उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत इटीसी केंद्राच्या संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांनी केले. दिव्यांग मुलांनी बनविलेल्या पणत्या आणि तुळशीचे रोप देऊन छोट्या दिव्यांग मुलांनी आयुक्तांना दिवाळी शुभेच्छा दिल्या.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना पालक हे दिव्यांग मुलाचे पहिले विशेष शिक्षक असल्याचे सांगून इटीसी केंद्रामध्ये शिक्षण, उपचार यासोबत दिव्यांग मुलांना व्यावसायिक शिक्षण तसेच प्रदर्शनासारख्या उपक्रमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी यापुढील काळात नियोजन करण्यात येईल असे सांगितले.
मुख्यालय व ईटीसी केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या वस्तू पाहून आयुक्तांनी दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांनी आपल्या हस्ते दिवाळीनिमित्त़ मुलांना खाऊ वाटप केले. यावेळी आयुक्तांनी कौतुकाने उचलून घेतलेली एक कर्णबधीर चिमुरडी मुलगी नंतर त्यांच्या कडेवरून उतरायलाच तयार नव्हती त्यामुळे आयुक्तांसह सर्वच आश्चर्यचकीत झाले. स्वत: आयुक्त या दिवाळी उत्सवात सहभागी झाल्याने दिव्यांग मुलांचा व त्यांच्या पालकांचा आनंद ओसंडून वहात होता.