उल्हासनगर परिवहन सेवेची वर्षपूर्ती

उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या रस्त्यांवरुन धावणाऱ्या परिवहन सेवेचे चाक १० वर्षं थांबले होते. पण, त्यानंतर २०२४ साली सुरु झालेल्या त्या गतिमान सेवेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रवाशांसाठी हक्काची, माफक दरातील आणि वातानुकूलित तसेच नॉन-एसी बससेवा सुरु झाल्याने हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिवहन सेवेचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

२०१४ पासून उल्हासनगरमध्ये परिवहन सेवा बंद होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महागड्या रिक्षांवर किंवा खाजगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा बससेवा पुनरुज्जीवित करण्याच्या निविदा प्रक्रिया बारगळल्या. मात्र, १२ मार्च २०२४ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त अजिज शेख आणि वाहन विभाग प्रमुख विनोद केणे यांच्या प्रयत्नांनी परिवहन सेवा अखेर सुरू झाली. परिणामी, उल्हासनगर, अंबरनाथ, शहाड, बदलापूर आणि कल्याण या शहरांना जोडणारी परिवहन सेवा पुन्हा कार्यरत झाली.

या बससेवेसाठी राष्ट्रीय हवा शुध्दीकरण प्रकल्पांतर्गत १२ मीटरच्या ५ वातानुकूलित बस आणि ९ मीटरच्या १० नॉन-एसी बस तापयात समाविष्ट करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालतात. त्यामुळे प्रदुषणाच्या समस्येत मोठी घट झाली आहे. सध्या उल्हासनगर ते बदलापूर प्रवास केवळ ३० रुपयांमध्ये वातानुकूलित बसने आणि आणखी स्वस्त दरात नॉन-एसी बसने करता येतो. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सदर सुविधा वरदान ठरली आहे.

दरम्यान, परिवहन सेवेमुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली असून, सध्या ४० चालक आणि ४० वाहक प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. दररोज ५ फेऱ्या सुरु असून लवकरच या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बससेवा ट्रान्सव्होल्ट उल्हासनगर प्रा. लि. कंपनी मार्फत सुरु आहे. या कंपनीचे गौरव वेदक, शशिकांत वडनेरे, तुषार महाले, दीपा तिवारी, निशांत घाडगे-पाटील, रवीना कांबळे, आशिष कदम, श्रीधर खोत आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्षपूर्तीचा आनंद साजरा केला.

परिवहन सेवा विस्ताराची तयारी; लवकरच १०० बसेस...
महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी परिवहन सेवेला आणखी वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून अधिक निधी मिळवून १०० बसेस आणि अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे भविष्यात सदर बससेवा ठाणे जिल्ह्यासह इतर भागांतही विस्तारली जाणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहर स्वच्छतेला ‘नमुंमपा'चे प्राधान्य