दीड वर्षात पाण्यासाठी एक कोटी रुपये खर्च
खारघर : खारघर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना टँकर मधील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. हौसिंग सोसायटीच्या देखभालीसाठी गोळा केला जाणारा पैसा वॉटर टँकरसाठी मोजावा लागत आहे. खारघर येथील महावीर हेरिटेज सोसायटी मधील नागरिकांना गेल्या दीड वर्षात टँकर मधील पाण्यासाठी जवळपास एक कोटी रुपये मोजावे लागल्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर वसाहतीत ४० सेक्टरचा समावेश असून, या ४० सेवटर मधील रहिवाशांना दैनंदिन ७५ एमएलडीपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, खारघर वसाहतीसाठी हेटवणे धरणातून जवळपास ६५ ते ७० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. खारघर वसाहती लगत असलेल्या अप्पर खारघर वसाहतीला खारघर मधून दैनंदिन दीड ते दोन एमएलडी तर तळोजा वसाहतीत आठ ते दहा एमएलडी पाणीसाठा उपलब्ध करुन द्यावा लागत आहे. खारघर वसाहतीचे हक्काचे पाणी अप्पर खारघर आणि तळोजा वसाहतीला द्यावे लागत असल्यामुळे खारघर वसाहतीमध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने खारघर वसाहतीतील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून, रहिवाशांना टँकर मधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
खारघर सेक्टर-३५ मधील महावीर हेरिटेज सोसायटीतील रहिवाशांना मागील वर्षी सत्तर लाख रुपये तर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात टँकरसाठी जवळपास तीस लाख रुपये मोजावे लागले आहेत. गेल्या दीड वर्षात सोसायटीने टँकर मधील पाण्यासाठी एक कोटी रुपये मोजले आहेत. महावीर हेरिटेज सोसायटी मध्ये २८० सदनिका असून, दैनंदिन २ लाख ४० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सिडकोकडून महावीर हेरिटेज सोसायटीसाठी केवळ १ लाख ४० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. त्यामुळे रोज १ लाख लिटर पाणी टँकरमधून विकत घ्यावे लागत असून, प्रति टँकर जवळपास अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत, असे महावीर हेरिटेज सोसायटी मधील रहिवाशांनी सांगितले. सिडकोकडे लेखी तक्रार केल्यास दोन ते तीन दिवस पुरेसे पाणी उपलब्ध होते. नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे' होत असते. सोसायटीच्या देखभालीसाठी जमा होणारा पैसा पाण्यासाठी खर्च करावा लागत असल्यामुळे महावीर हेरिटेज सोसायटी मधील नागरिक संतप्त झाले आहेत. या संदर्भात सिडको पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी बी. व्ही. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.
राजकीय नेते मात्र शांत
तळोजा वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून काम दाबाने पाणी पुरवठा होत आहे. आजही बहुतांश सोसायटी मधील रहिवाशांना टँकर मधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळी सणात रहिवाशांना पाणी विकत घेवून दिवाळी साजरी करावी लागली. तळोजा वसाहतीत पाणी टंचाई असताना गेल्या वर्षभरात एकाही राजकीय पक्षाने पाणी प्रश्न उपस्थित केला नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पाणी प्रश्नावर राजकीय पदाधिकारी डोळे बंद करुन बसल्याचे चित्र दिसत आहे.
सिडकोकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरसाठी लाखो रुपये मोजावे लागत होते. मात्र, सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या जुन्या विहिरीला पुनर्जीवित केल्यामुळे विहिरीतील पाणी कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी उपयोगात येत असल्याने टँकरवर होणारा खर्च कमी झाला आहे. मात्र, वर्षात ७ लाख रुपये टँकरसाठी खर्च झाल्याचे सोसायटीच्या सभेत उघड झाले. - गुलाम सरफरे, रहिवाशी - गामी हौसिंग सोसायटी, तळोजा फेज-१.
सिडकोकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महावीर हेरिटेज सोसायटी मधील प्रती कुटुंबास टँकर मधील पाण्यासाठी वार्षिक जवळपास २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. सोसायटीचा गेल्या दीड वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च टँकर मधील पाण्यावर झाला आहे. शिवाय अपुऱ्या पाण्यामुळे सोसायटीत वाद निर्माण होत आहेत. सिडको, पनवेल महापालिका प्रशासनाकडे कर भरणा करुनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, हिच खेदाची बाब आहे. सिडको प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये. - सुनील धुमाळ, पदाधिकारी - महावीर हेरिटेज सोसायटी, सेक्टर-३५, खारघर.