‘केडीएमसी'ची विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव विश्वविक्रमी कार्यशाळा

कल्याण : आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि जनजागृतीप्रधान व्हावा या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एज्युकेशन टुडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित बाप्पा-फलीत बाप्पा' या संकल्पनेवर आधारित भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा डोंबिवली (पूर्व) येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी सभागृहात पार पडली.

या कार्यशाळेस शालेय विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून, अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दोन सत्रांमध्ये झालेल्या सदर कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील सुमारे ५२४५ विद्यार्थी सहभागी झाले. सकाळी ८ वाजल्यापासूनच सभागृह चिमुकल्या मुलांच्या किलबिलाटाने भरुन गेले होते. तन्मयतेने आणि आपले भान हरपून शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती साकारणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला ‘कल्याण ग्रामीण'चे आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी देखील मनापासून दाद दिली.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेशाची मूर्ती तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तर कार्यशाळेमध्ये क्षितीज गतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ठ श्री गणेश मूर्ती आपल्या हातांनी साकारल्या. यापूर्वी बंगलोर येथील पोल्यूशन कंट्रोल बोर्ड यांचा एकूण ३३०८ पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती बनविण्याचा जागतिक विक्रम ‘केडीएमसी'च्या सदर कार्यशाळेत मोडीत निघाला असून, या कार्यशाळेत एकूण ५२४५ विद्यार्थ्यांनी श्री गणेश मूर्ती साकारल्याने याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉडस्‌ आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डस्‌ मध्ये घेतली असल्याचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌च्या सीमा मणिखोत आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉडस्‌चे डॉ. दिनेश गुप्ता यांनी घोषित केल्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स साठी सदर प्रस्ताव प्रस्तावित आहे.

पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा व्हावा, जास्तीत जास्त नागरीकांनी पर्यावरण पूरक श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती स्थापनेची भावना रुजवावी, म्हणून ‘हरित बाप्पा, फलित बाप्पा' या संकल्पनेवर सदर कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.

कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी, महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि शाळांचे शिक्षक मिळून एवूÀण ५२४५ जणांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. याचीही दखल ओेएमजी बुक ऑफ रेकॉडस्‌ने घेतल्याची माहिती या कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख तथा पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रोहिणी लोकरे यांनी दिली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, उपायुक्त संजय जाधव, समीर भुमकर, वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा.आयुक्त प्रिती गाडे, हेमा मुंबरकर, राजेश सावंत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच मूर्तीकार सचिन गोडांबे, मिनल लेले, शेखर ईश्वाद, संतोष जांभुळकर, गुणेश अडवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता पर्यावरण कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांच्या विभागातील सहकारी तसेच ‘एज्युकेशन टुडे फांऊडेशन'चे भरत मलिक आणि वृंदा भुस्कुटे यांनी अथक परिश्रम घेतले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढवण विकासासाठी ‘सिंगापूर'ने सहकार्य करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस