औरंगजेबाचे गोडवे गाणारे देशद्रोहीच
डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महारांज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
डोंबिवली : औरंगजेब महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला होता. पण, छत्रपती शिवाजी महाराज एक दैवी शक्ती होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रति क्रुरता दाखवली. या औरंगजेबाचे गोडवे काही लोक गातात. हेच गोडवे गाणारे देशद्रोहीच आहेत, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे केला.
डोंबिवली पूर्व येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. हीच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असेही ना. एकनाथ शिंदे म्हणाले. सदर सोहळ्याला हजाराेंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते. आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. विकासाला पुढे नेणारे, लोकाभिमुख योजना राबवणारे हे सरकार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्व मधील घारडा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदाररित्या पार पडले. यावेळी हजारो डोंबिवलीकरांनी याची देही याची डोळा सदर सोहळा अनुभवला. या सोहळ्यासाठी दुपार पासूनच आबालवृध्दांनी घारडा चौकात गर्दी केली होती. आता सदर चौक यापुढे घारडा सर्कल नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले.
ना. एकनाथ शिंदे यांनी भाषणातू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती. लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दृरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे निती, शिवछत्रपती म्हणजे युगपुुष, शिवछत्रपती म्हणजे प्रवर्तक, शिवछत्रपती म्हणजे रयतेचा राजा अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराजांची थोरवी गायली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अश्वारुढ पुतळ्याची रचना वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जनतेला दर्शन देताना या पुतळ्यात दिसतात असे सांगत ना. शिंदे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. शिवरायांचा पुतळा पुढील पिढ्यांना इतिहासाची आठवण करुन देत राहिल. तरुण पिढी, मुलांना ऊर्जा देत राहील. डोंबिवलीकर शिवभक्तांना या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असेही ना. एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक काव्य सादर करत त्यांच्या पराक्रमाची थोरवी गायली.
याप्रसंगी हिंदुराष्ट्र सेनाप्रमुख धनंजयभाई देसाई, समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, युवा सेना कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, रवि पाटील, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह हजारो डोंबिवलीकर, शिवभक्त, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.