सात जोडप्यांच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी
नवी मुंबई: विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सात जोडप्यांनी कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे झालेल्या लोकअदालतीदरम्यान घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा एकत्र संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्याने कुटुंबीयांबरोबरच मुलांनाही दिलासा मिळाला आहे.
शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात पार पडलेल्या लोकअदालतीत कौटुंबिक न्यायालयातील एकूण ९८ दावे सुनावणीस ठेवण्यात आले होते. यापैकी सात जोडप्यांनी पुन्हा सहजीवनाची निवड केली. त्यानंतर न्यायाधीशांच्या हस्ते या जोडप्यांचा नवी मुंबई कोर्ट वकिल संघटनेतर्फे “नांदा सौख्यभरे” प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या लोकअदालतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल, बेलापूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश-१ सी. व्ही. मराठे, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष रं. काफरे आणि प्राधिकरणाचे सचिव रविंद्र पाजणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या न्यायालयात वैवाहिक वाद आणि पोटगीसंदर्भातील तब्बल १,७७२ दावे प्रलंबित आहेत. त्यापैकी ९८ प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती. या कार्यवाहीत जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. ए. साने आणि विधीज्ञ डिंपल चांद्रा यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई कोर्ट वकील संघटनेचे अध्यक्ष सुनिल मोकल, उपाध्यक्ष संदिप रामकर, सचिव विकास म्हात्रे, खजिनदार तुषार राऊत व इतर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
याशिवाय कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक गणेश हिरवे, विवाह समुपदेशक भारत काळे, लघुलेखक विजय पोटे, सहा अधिक्षक राजेश म्हात्रे, वरिष्ठ लिपीक कांचन किर्वे, कनिष्ठ लिपीक श्रेया म्हात्रे, अक्षता कोळसुंदकर आणि सहाय्यक प्रीती नन्नावरे व राज निकम यांनी लोकअदालतीच्या यशात मोलाचा वाटा उचलला.