५ वी, ८वी शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महापालिका शाळेतील 47 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

नवी मुंबई: महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या दोन इयत्तांसाठी घेण्यात आलेल्या स्कॉलरशीप परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळांमधील इयत्ता 5 वी च्या 129 व इयत्ता 8 वी च्या 110 अशा एकूण 239 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषद मार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या दोन इयत्तांसाठी स्कॉलरशीप परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम असलेल्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 2441 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 3509 विद्यार्थी असे एकूण 5950 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 851 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 793 विद्यार्थी असे एकूण 1644 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वी च्या 25 विद्यार्थ्यांना व इयत्ता 8 वीच्या 22 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकूण 47 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली येथील स्वराली विठ्ठल जगधने (इयत्ता 8 वी) या विद्यार्थिंनीने महापालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला असून ठाणे जिल्हयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभ्रा भगवान गायकवाड (इयत्ता 5 वी) या विद्यार्थिनीने नमुंमपा शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणा-या स्वराली व शुभ्रा तसेच सर्वच गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

नमुंमपा शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शिका पुरवण्यात आल्या होत्या. तसेच जादा तासिकांचे आयोजन, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यासोबतच सराव परीक्षांचे केंद्र स्तरावर व शाळा स्तरावर आयोजन या सर्व बाबींमुळे नवी मुंबई महापालिका विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

५ हजार विद्यार्थ्यांनी साकारल्या चित्रमय स्वच्छता संकल्पना