गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय; महापालिका शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषद
कल्याण : महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच ‘शिक्षण परिषद'चे आयोजन कल्याण मधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या ‘शिक्षण परिषद'ला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करुन त्यांच्याशी संवादही साधला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निपुण भारत कार्यक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत बौध्दीक स्तर वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विनोबा भावे ॲपच्या माध्यमातून मराठी-इंग्रजी आणि गणित विषयाची चाचणी घेण्यात आली आहे. त्याद्वारे महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत, ते निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील ३ महिन्यांमध्ये महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करुन अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रारंभिक चाचणीमध्ये समोर आलेल्या विद्यार्थ्यांचा बौध्दीक स्तर शिक्षकांना माहिती करुन देणे, आवश्यक ते नियोजन करणे आणि ३ महिन्यात महापालिका शाळांतील असे सर्व विद्यार्थी अंतिम टप्प्यापर्यंत कसे पोहोचतील याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. यामध्ये महापालिका शाळांचे सर्व शिक्षक, सनियंत्रण अधिकारी, मार्गदर्शन करण्यासाठी काही शिक्षण अभ्यासकही सहभागी झाले होते.
महापालिकेकडून आता विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि महापालिका शिक्षकांची शिक्षण परिषद दर महिना घेण्यात येणार आहे. जेणेकरुन शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासह त्याची परिणामकारकताही समोर येईल आणि महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थी पायाभूत चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतील. याची दखल न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या सर्व उपक्रमांमागील अंतिम ध्येय असल्याचा निर्वाळा आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना दिला. तसेच सदरची काही अवघड गोष्ट नसून महापालिका शाळांमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात, असा विश्वासही आयुक्त गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर ‘शिक्षण परिषद'ला महापालिका शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे तसेच ‘विनोबा भावे ॲप'चे भैरव गायकवाड उपस्थित होते.