वसई-विरार मध्ये लवकरच क्लस्टर योजना -ना. प्रताप सरनाईक

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीतील नारंगी रोड, विरार (पूर्व) येथे रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रकृती रुग्णालय, विरार (पश्चिम) येथे भेट  घेऊन जखमींच्या आरोग्याची माहिती जाणून  घेतली. तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून दिलासा दिला.

ना. प्रताप सरनाईक यांनी वसई-विरार महापालिका मुख्यालय येथे आढावा बैठक  घेऊन दुर्घटनास्थळाची पाहणी करत रहिवाशांशी चर्चा केली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तात्पुरत्या निवासाची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी त्वरित ‘म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून ‘म्हाडा'ची ६० घरे महापालिकेला उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.  भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे सांगत ना. प्रताप सरनाईक यांनी वसई-विरार शहर महापालिकेत क्लस्टर योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय  घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नामदार सरनाईक यांनी चर्चा केली असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अतिधोकादायक इमारती रहिवाशांशी संवाद साधून तातडीने रिक्त करा