राजन विचारे, केदार दिघे यांच्या मागणीनुसार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सची तपासणी-पडताळणी

ठाणे : ‘भारत निवडणूक आयोग'कडून प्राप्त १७ जून रोजीच्या पत्र आणि त्यासोबतच्या एसओपी नुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मधील ठाणे जिल्ह्यातील १४७-कोपरी पाचपाखाडी आणि १४८-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील अर्जदार उमेदवार राजन विचारे आणि केदार दिघे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र क्रमांक अनुक्रमे ३०५ आणि ६८ मधील ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या बर्नट्‌ मेमरी- मायक्रो कंट्रोलच्या तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया १९ जुलै रोजी केंद्रीय वखार महामंडळ, तुर्भे, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.

‘भारत निवडणूक आयोग'कडील निर्देशानुसार आणि विहित कार्यपध्दतीनुसार अर्जदार उमेदवार यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या बर्नट्‌ मेमरी- मायक्रो कंट्रोल तपासणीच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले डायग्नोस्टीक चेकिंग आणि मॉक पोल या पर्यायापैकी डायग्नोस्टीक चेकींग करण्याबाबतचा पर्याय निवडला.

‘निवडणूक आयोग'कडील कार्यपध्दतीनुसार डायग्नोस्टीक चेकींग या पर्यायानुसार अर्जदाराने निवड केलेल्या मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष वापरण्यात आलेली बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट यांची जोडणी करण्यात येते. जोडणी केल्यानंतर सदर मशीन सेल्फ डायग्नोस्टीक चेक करून त्याबाबत व्हीव्हीपॅटमध्ये ७ स्लिप्स प्रिंट होतात. या कार्यवाही दरम्यान अर्जदार उमेदवारास किंवा त्यांच्या प्रतिनिधीस या मशीनमध्ये मतदान केंद्रावरील झालेले केवळ एकूण मतदान दाखविण्यात येते.

भारत निवडणूक आयोग यांच्याकडील कार्यपध्दतीनुसार मॉक पोल पर्याय निवडल्यास अर्जदाराने निवड केलेल्या मतदान केंद्रावरील सीयू मधील संपूर्ण निकाल अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांना दाखविण्यात येतो. त्याची नोंद विहित नमुन्यात करण्यात येवून त्यावर उपस्थित अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घेण्यात येते. त्यानंतर सीयू मधील संपूर्ण डेटा काढून टाकण्यात  येवून बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट यांची जोडणी करण्यात येते. त्यानंतर मॉक पोलची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. या मॉक पोलमध्ये किमान ५०० मतदान करण्यात येते. त्यानंतर या मॉक पोलचा निकाल अर्जदार उमेदवार,प्रतिनिधी यांना पुन्हा दाखविण्यात येतो आणि त्याची नोंद घ्ोवून उपस्थित अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी घेण्यात येतात.

१४७-कोपरी पाचपाखाडी आणि १४८-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील अर्जदार उमेदवारांनी डायग्नोस्टीक चेकींग पर्याय निवडल्यामुळे ‘निवडणूक आयोग'कडील विहित कार्यपध्दतीनुसार मशीनमधील एकूण झालेले मतदान दाखविण्यात आले असून ते बरोबर असल्याचे दिसून आले. सदर प्रक्रिया ‘निवडणूक आयोग'ने प्राधिकृत केलेल्या भारत ईलेक्ट्रॉनिक्स लि. कंपनीच्या अभियंत्याद्वारे पूर्ण करण्यात आली.

सदर तपासणी प्रक्रिया अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली असून मतदान केंद्र क्रमांक-३०५ आणि६८ मधील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन डायग्नोस्टीक टेस्ट पास झाल्या आहेत. यावेळी उपस्थित अर्जदार उमेदवार, प्रतिनिधी यांच्या शंकाचे निरसन भारत ईलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अभियंत्यांनी केले असून सदर प्रक्रिया समाधानकारकरित्या पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा