अनधिकृतपणे पाणी उपसा
पाणी माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरांमध्ये अनधिकृतरित्या पाणी उपसा करणारी ७१ बोअरवेल केंद्र असून त्यातील पाणी महाग दराने गोरगरीब जनतेला विक्री होत असल्याची माहिती उजेडात आली आहे. तहसीलदार कार्यालयाने याबाबत नोटीस बजावली असून ९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सर्व पाणी माफियांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी मिरा-रोडच्या डाचकुलपाडा परिसरात झालेल्या दोन गटातील दंगलीनंतर काही पाणी माफिया या भागात सक्रिय असल्याची आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यातूनच त्यांनी केलेले अनधिकृत बांधकामे चर्चेत आली. त्याचबरोबर पाणी माफियांनी या परिसरात बोअरवेल खोदून त्यातील पाणी चढ्या दराने विक्री करत असल्याचे उजेडात आले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाने अनधिकृत बोअरवेल शोधण्याची मोहीम राबविली असता ७१ बोअरवेल केंद्र असल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली. त्यातील फक्त ९ जणांनी उत्तर दिले, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इतर ६२ जणांनी नोटीस गांभीर्याने घेतली नाही.
त्यामुळे अशी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आणि आपले वर्चस्व गाजवणाऱ्या भूमाफियांवर तातडीने आजच्या आज गुन्हे दाखल करण्याचे निर्देश ना. सरनाईक यांनी पोलीस अधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले. त्याचसोबत बोअरवेल सील न करता त्याच बोअरवेलवर पुढील २ दिवसात हँडपंप बसविण्याचे निर्देश संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन ते पाणी गोरगरीब जनतेला विनामूल्य उपलब्ध होईल.