आंदोलनादरम्यान उरलेली अन्नधान्याची रसद इतर कार्यासाठी वापरणार

नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर येथे आलेली रसद आता मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या सांगतेमुळे उरलेली आहे. त्यामुळे उरलेली सदर रसद आता मुस्लिम बांधव, महापालिका साफसफाई कर्मचारी तसेच नगद नारायण गड बीड यांना देण्याचा निर्णय सकल मराठा समाज, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

२९ ऑगस्ट पासून आझाद मैदानात सुरु झालेल्या संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची २ सप्टेंबर रोजी सांगता झाली. ज्यावेळी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव दाखलक आले, त्यावेळी सरकारने आणि महापालिकेने २८ आणि २९ ऑगस्ट रोजी कुठल्याही सुविधा न पुरवल्याने मुंबईमध्ये अनेक मराठा आंदोलकांची गैरसोय झाली. २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानाच्या बाजुला असलेले शॉप्स, फुड स्टॉल बंद ठेवले गेले. त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या मराठा आंदोलकांना तेथून हुसकावून लावून अन्नछत्र बंद करण्यात आले. सदर बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मराठा सैन्याची रसद सरकारने रोखली. यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रसद यायला सुरुवात झाली. ज्यामध्ये भाकरी, चटणी, ठेचा, पोळी असे सर्व लाखोंच्या संख्येमध्ये पाठवण्यात आले. तांदळाचे कट्टे आले, तेलाचे डबे, पाण्याच्या बॉटल्स आल्या. याशिवाय इतरही काही जे साहित्य ज्यामध्ये फरसाण, भेळ, बिस्किटस्‌,  फ्रुटस्‌, आदिंचाही समावेश आहे.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी उपोषण आंदोलनाची सांगता झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली अन्नधान्याची रसद वाशी मधील सिडको एविझबिशन सेंटर येथे उरलेली आहे. त्यामुळे सदरची रसद योग्य ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकेल, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई संयोजन कमिटीने घेतला आहे. त्यानुसार पाण्याच्या जितक्या बॉटल आहेत, त्या सर्व मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमासाठी मराठा समाज मोफत देणार आहे. भेळ, फरसाण असे पदार्थ महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना दिले जाणार असून तांदूळ, तेलाचे डबे किंवा इतर ज्या काही वस्तू उरलेला आहेत त्या सर्व नगद नारायण गड बीड येथे दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या लाखो बहुजन समाज बांधवांच्या जेवणाची सोय म्हणून पाठविण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज, नवी मुंबई तर्फे देण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत १७२३६ श्रीगणेशमूर्तींसह १९५९ गौरींचे विसर्जन