‘नमुंमपा'ची प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहीमे सुरुच
नवा मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहिमा सातत्याने सुरु असून या माध्यमातून एकल वापरातील प्लास्टिक नागरिकांकडून वापरलेच जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.
या अनुषंगाने परिमंडळ-१ विभागाच्या भरारी पथकाने उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एकल वापरातील प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोवर धडक कारवाई केली. यामध्ये आढळलेले ५० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचे गठ्ठे जप्त करण्यात आले. अशाचप्रकारे परिमंडळ-२ चे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ-२ च्या भरारी पथकाला घणसोली, सेक्टर-११ येथील बी-मार्ट मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने तेथे उपलब्ध प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे परिमंडळ-२ च्या भरारी पथकाने ऐरोली, सेवटर-६ येथील तपासणीत महालक्ष्मी फास्ट फूड या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून दंड वसूल करीत १ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केलेला आहे.
प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा आणि त्यातही प्राधान्याने आढळणारा प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांकडून थांबावा याकरिता ‘नमुंमपा'च्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर केला जावा यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांद्वारेही बाजारात वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई करुन नियंत्रण आणले जात आहे. त्यामुळे प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला असलेला धोका लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिक वस्तुंचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.