नवी मुंबई विमानतळातील १ लाख नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात; ‘मनसे'चा आरोप

 नवी मुंबई; नवी मुंबई विमानतळ येथे एकूण ४ टर्मिनल आहेत. प्रत्येक टर्मिनलवर साधारण २५ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एकूण १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सध्या पहिल्या टर्मिनल मध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिकांना डावलले असल्याचे दिसून येते. माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भात ‘सिडको'ने कोणतेही धोरण आखले नाही. तसेच आतापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केले याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. याबाबत मनसे प्रवक्ते तथा  शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला.

२ वर्षांपूर्वी अयोध्येत स्थापन झालेल्या कंपनीने नवी मुंबई विमानतळ येथे नोकरीला लावून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे पुराव्यासह दाखवून दिले. एका मराठी तरुणाकडून या कंपनीने नवी मुंबई विमानतळ मध्ये नोकरीला लावतो म्हणून ८८ हजार रुपये घेतले आणि फसवणूक केल्याची बाब सदर तरुणाच्या चहा विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितली त्याचप्रमाणे मनसे बेलापूर विभागअध्यक्ष आणि भूमीपुत्र भूषण कोळी यांनी आगरी-कोळी समाजाला ‘सिडको'ने नोकऱ्या संदर्भात फसवले याची माहिती दिली. ‘सिडको'ने भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून ‘कौशल्य विकास'चे प्रशिक्षण कार्यक्रम आखले होते. परंतु, सिडको प्रशासनाच्या अनास्थेमुळे सदर प्रशिक्षण कार्यक्रम बंद झाले. आता विमानतळ प्रकल्पाशी संबंधित नोकऱ्या मिळण्यासाठी जे कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे, ते ‘सिडको'ने उपलब्ध करुन न दिल्याने खाजगी प्रशिक्षण केंद्रात लाखो रुपये भरण्याची नामुष्की भूमीपुत्रांवर आली आहे. 

सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने या नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे, असा घणाघात गजानन काळे यांनी यावेळी केला. जर प्रशासनाने स्थानिक आणि मराठी भाषिकांना नोकरीत प्राधान्य नाही दिले, तर येत्या काही दिवसात मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला. तसेच महाराष्ट्र सैनिकांना विमानतळाची धावपट्टी उखडणे अवघड काम नसल्याचे सांगून राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या विमानतळावरुन एकही विमान उडू न देण्याची सोय आम्ही करु, असा इशाराही गजानन काळे यांनी दिला.

या पत्रकार परिषद प्रसंगी गजानन काळे यांच्यासह उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अभिलेश दंडवते, सागर विचारे, शाम ढमाले, मनसे महिला सेना उपशहरअध्यक्ष दिपाली ढवूल, शहर सचिव यशोदा खेडसकर, उपविभागअध्यक्ष संदेश खांबे, आदि उपस्थित होते.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केडीएमसी महापौर बंगल्याची दुरवस्था