नवी मुंबई महापालिका दोन स्कॉच पुरस्काराने सन्मानित  

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली अशा दोन्ही प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने नवी दिल्ली येथील स्कॉच समीटच्या 100 व्या विशेष समारंभात सन्मानीत करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे सचिव अजय सेठ व स्कॉच समुहाचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्कॉच समुहाचे संचालक डॉ.दीपक फाटक व उपाध्यक्ष डॉ.गुरशरण धंजल यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हे राष्ट्रीय मानाचे दोन स्कॉच पुरस्कार स्विकारले.

एकाच वेळी महानगरपालिकेच्या २ उल्लेखनीय प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने नावाजले जाणे ही नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट असून त्याबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी आयुक्त यांचेसमवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता  अरविंद शिंदे उपस्थित होते. 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेचा जलव्यवस्थापनावर विशेष भर असल्याचे सांगत या शहरात ८५ टक्के मीटर कनेक्शन असल्याचे ते म्हणाले. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी आधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याच्या वापरावर महापालकेद्वारा भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

त्याचप्रमाणे अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेट फ्लान्टमधील ५० द.ल.लि. पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना देण्याची कार्यवाही सुरू असून ९६ टक्के पाणी देयकांची वसूली होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

तर कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विशेषत्वाने महिलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी कॅन्सरविषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली महानगरपालिकेने सुरू केल्याचे डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व 26 नागरी आरोग्य केंद्रात व रुग्णालयात कॅन्सरविषयक प्राथमिक तपासणी केली जात असून संशयित रूग्ण आढळल्यास त्यांना नामांकित टाटा कॅन्सर रूग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  

तशा प्रकारचा सामंजस्य करार झालेला असून आत्तापर्यंत १० हजारहून अधिक महिलांची कॅन्सरविषयक तपासणी करण्यात आली आहे व त्यामधील ५ महिलांमध्ये लक्षणे आढळल्याने पुढील उपचारासाठी टाटा रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे. सर्वसामान्य रूग्ण केमोथेरपी उपचारापासून पैशांअभावी वंचित राहू नये यादृष्टीने महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयात विशेष केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात आला असल्याचेही आयुक्तांनी याप्रसंगी आपल्या मनोगतात सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘जॉय'द्वारे २०० विद्यार्थ्यांना किराणा किट, संगणक आणि शाळेच्या विकासासाठी मदत