विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जनजागृती

भिवंडी : एक मत, एक मूल्य असे सूत्र राज्यघटनेने ठरवून दिले आहे. असे असताना मतदानाबाबत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उदासीनता पहायला मिळते. पण, शालेय विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया थेट प्रत्यक्षात राबवली तर..., त्याअनुषंगाने भिवंडी मधील डुंगे या ‘ठाणे जिल्हा परिषद'च्या शाळेत या निवडणुकीचा प्रयोग राबवण्यात आले. झालेल्या निवडणुकीत वैदेही पाटील, रिध्देश म्हणेरे मुख्यमंत्री पदी  बहुमताने विजयी झाले.

जिल्हा परिषद शाळा डुंगे येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रत्यक्ष कशा पध्दतीने राबवली जाते, त्याच पध्दतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी उमेदवारांना निवडणुकीस उभे राहण्यापासून ते प्रत्यक्ष मतमोजणी पर्यंतची कशा प्रकारे पध्दत असते, याबद्दल पूर्णतः माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता फॉर्म भरुन उभे राहणे, त्यासाठी दोन दिवस मुदत देण्यात आली. त्यानंतर कोणास माघार घ्यायची असेल तर त्याबद्दलही माहिती देण्यात आली. निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना २ दिवसांचा कालावधी देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी शाळेच्या वर्ग खोलीमध्ये मतदान केंद्र उभे करण्यात आले. त्यासाठी तीन मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, शिपाई तसेच सुरक्षा यंत्रणेसाठी आवश्यक असणारे पोलीस यांचीही व्यवस्था करण्यात आली.

यासाठी इयत्ता चौथी मधील चिन्मय पाटील आणि जिग्नेश पाटील यांनी पोलीस शिपाई म्हणून जबाबदारी स्वीकारली. पाचवी मधील प्रणिता पाटील हिने केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. मतदानाधिकारी म्हणून यज्ञ भगत, जन्मेश भगत, अर्धी भगत यांनी जबाबदारी स्वीकारली. सर्व विद्यार्थ्यांनी बॅलेट पेपरवर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री, स्वच्छतामंत्री, क्रीडामंत्री, परसबागमंत्री या पदासाठी मतदान व्ोÀले. तर डिजीटलमंत्री आणि वाचनालयमंत्री बिनविरोध निवडून आले. शालेय मुख्यमंत्री म्हणून वैदही पाटील आणि रितेश म्हणेरे विजयी झाले. तसेच सांस्कृतिकमंत्री म्हणून रिध्दी भगत आणि जीविका पाटील, क्रीडामंत्री यशस्विनी भगत आणि आर्यन पाटील, स्वच्छतामंत्री मेहुल भगत, आरोग्यमंत्री यश पाटील, डिजीटलमंत्री जन्मेश भगत,  वाचनालयमंत्री यज्ञ भगत अशा रितीने विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात, उत्साहात या निवडणूक प्रक्रियेचा आनंद घेतला. आम्हाला प्रत्यक्ष मतदान करतानाही खूप आनंद झाला, अशा विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सायली सुहास महाबळेश्वरकर तसेच सहशिक्षिका सावित्रा थोरात, कविता घागस, कांचन ठाकरे, आदिंनी मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. अशा पध्दतीने लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना मतदानाविषयी जनजागृती केली तर विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी निरसता जाऊन उत्साह येतो आणि भारतीय लोकशाही बळकट होण्यास हातभार लागेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

राज्यघटना आणि मुख्यमंत्री...
भारतीय राज्यघटनेने त्या त्या राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असे संवैधानिक पद निर्माण केले. निवडून आलेले आमदार मुख्यमंत्री निवडत असतात. असे असताना एकूण निवडणूक प्रक्रिया काय असते? ते विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डुंगे शाळेने शाळाअंतर्गत निवडणूक घेऊन नवा आदर्श घालून दिला आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शाळा-महाविद्यालयांमधून १३०० किलो प्लास्टिक संकलन