खचलेल्या रस्त्याच्या कामात नियमभंग

भाईंदर : भाईंदर पूर्व इंद्रलोक भागातील रस्ता खचून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेऊनही महापालिकेने दुर्लक्ष केल्यावर सदर रस्त्याचे बिल्डरने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम ‘एमएमआरडीए'च्या अभियंत्यांनी पाहणी केल्यावर नियमानुसार होत नसल्याचे आढळून आल्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे.

भाईंदर पूर्व इंद्रलोक भागातील तपोवन शाळेजवळच्या सीसी रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी ‘एमएमआरडीए'कडून करण्यात आले होते. याच रस्त्यालगत आरएनए बिल्डरच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी इमारतीच्या पोडियमसाठी खोदकाम करताना बिल्डरने रस्त्याखालील जमीन खचणार नाही, यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी, १७ मे रोजी या रस्त्याखालची जमीन खचल्याची घटना घडली होती. ‘एमएमआरडीए'ने सदर रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी बिल्डरवर निश्चित केली होती. तसे पत्र ‘एमएमआरडीए'ने मिरा-भाईंदर महापालिकेला १९ मे रोजी पाठविले. यानंतरही बिल्डरने सदर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली नाही.

अलिकडेच बिल्डरने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी ते नियमानुसार केले जात नसल्याचे ‘एमएमआरडीए'च्या निदर्शनास आले आहे. त्यांनी त्या कामाचा आढावा घेत महापालिकेला ११ जून रोजी पत्र पाठवून त्या रस्त्याची होत असलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असून भविष्यात होणाऱ्या नुकसानीला बिल्डरच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बिल्डरने त्याच्या जागेत खोदकाम करताना कोणतीही सुरक्षा अथवा उपाययोजना केली नसल्यानेच निष्काळजीपणामुळे रस्त्याखालची जमीन खचल्याचे ‘एमएमआरडीए'ने या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, सदर रस्त्याच्या दुरुस्तीवेळी ‘एमएमआरडीए'च्या अभियंत्यांनी स्थळपाहणी केली असता बिल्डरकडून या सीसी रोड बांधकामाच्या विशिष्ट बाबींचे पालन न करताच काम सुरु करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गडकरीं'च्या ‘रोडकरी' प्रतिमेला धक्का