पावसाळापूर्व नालेसफाई; ३१ मे पर्यंत डेडलाईन

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाला २१ एप्रिल पासून सुरूवात झाली आहे. सदर कामे पावसाळ्यापूर्वी, मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आश्वासित केले आहे. पहिल्या टप्प्यात ५ प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काम २५ एप्रिल पासून काम सुरु होणार आहे.

२१ एप्रिल रोजी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशनलगत असलेल्या नालेसफाईने या मोहिमेचा आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम, आदि उपस्थित होते.

त्यानंतर हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरु करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपान भाईक, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे-मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा-कोपरी, उथळसर, माजिवडा-मानपाडा, दिवा आणि कळवा या ५ प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा, लोकमान्य नगर-सावरकर नगर, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरु होणार आहे.

नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदविण्यात यावी. तसेच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा. नाल्यातून उचललेला गाळ तत्काळ उचलला जावा. त्यामुळे दुर्गंधी पसरु नयेे.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंगरावरील वन्यजीवांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या तरुणांचा सत्कार