एपीएमसी पोलिसांकडून २ परदेशी नागरिकांची धरपकड

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या परदेशी नागरिकांवरील कारवाई सुरुच असून शनिवारी रात्री एपीएमसी पोलिसांनी कोकेन हा अमली पदार्थ विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणखी दोन परदेशी नागरिकांची धरपकड केली आहे. इफेनी उजोमा औसोंडु  (५६) व साजींनी मेमोरि गामा (४९) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २० लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१.६४ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. 

गत शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्यातील पथक कोपरी गाव परिसरात पेट्रिलिंग करत असताना, पोलिसांना नायजेरियन नागरिक इफेनी उजोमा औसोंडु व दक्षिण आफ्रिका देशातील साजींनी मेमोरि गामा हि महिला हे दोघेही संशयास्पदरित्या कोपरी गावात वावरताना निदर्शनास आले. मात्र यावेळी त्यांनी पोलिसांची गाडी पाहिल्यानंतर ते लगबगीने कोपरी गावातील मराठी शाळेलगतच्या इमारतातीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये घुसले. यावेळी पोलिसांना या दोघा परदेशी नागरिकांचा संशय आल्याने त्यांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांचा फ्लॅट गाठला.

मात्र त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतल्याने पोलिसांनी त्यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले, मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जवळ असलेले कोकेन हे अमली पदार्थ किचनमध्ये लपवून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी ते राहत असलेल्या घरातील किचनची तपासणी केली असता, त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये लपवून ठेवलेले तब्बल २० लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१.६४ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघा विरोधात एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळ सापडलेले कोकेन जप्त केले आहे. न्यायालयाने या दोघांची २ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश मांडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक व त्यांच्या पथकाने केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

१८ बोगस डॉक्टरांविरुध्द गुन्हा