सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये विकसित करणार एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क

नवी मुंबई : भारतामधील लॉजिस्टिक्स क्षेत्र ई-कॉमर्स, उत्पादन आणि जागतिक व्यापाराच्या वाढीमुळे वेगाने विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून पुढे येत आहे—अनेक वर्षांची संकल्पना आता प्रत्यक्षात आकार घेत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसोबत असलेले सान्निध्य तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, प्रस्तावित मल्टी-मोडल कॉरिडॉर तसेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमुळे लाभलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे नवी मुंबई एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत आहे.

या धोरणात्मक संधीचा लाभ घेण्यासाठी सिडकोने पुष्पक नोडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जमीन एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क (आयएलपी) विकसित करण्यासाठी राखीव ठेवली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या क्षेत्रावर आवश्यक पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा, सामायिक सुविधा आणि उपयुक्तता जाळ्यांचा समावेश असेल.

“जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मजबूत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी यांसारख्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवी मुंबईचे मोक्याचे स्थान, या बळावर, नवी मुंबई हे लॉजिस्टिक्स व संबंधित उद्योगांसाठी नैसर्गिक केंद्र म्हणून आकार घेत आहे. एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कच्या विकासाद्वारे, सिडको कार्यक्षम मालवाहतूक सुलभ करणारी, गुंतवणूक आकर्षित करणारी आणि आर्थिक विकासाला चालना देणारी भविष्याभिमुख परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राथमिक टप्पा हा या क्षमतेला चालना देत नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

या प्रकल्पासाठी जमीन वाटप, विकास आणि वितरण हे महाराष्ट्र शासनाच्या एमआयडीसी पास-थ्रू धोरणानुसार करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून संपूर्ण क्षेत्र सात लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व भूखंडांना सुलभ जोडणी मिळावी यासाठी ४५ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्राथमिक जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे.

प्राथमिक टप्प्यात, सिडकोने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे लँड पार्सल एल-१ मधील सुमारे ७२ हेक्टर (१७९.२९ एकर) क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केली आहे. या प्रकल्पासाठी रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिःस्सारण जाळे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा सिडकोकडून विकसित करण्यात येतील.

निवड प्रक्रियेनंतर, यशस्वी अर्जदार आणि सिडको यांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येईल, ज्यामध्ये संबंधित भूखंडाच्या शुल्क भरणा आणि अधिग्रहणासंबंधी अटी नमूद असतील. महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण आणि त्यातील पुढील अद्ययावतीकरणांनुसार या प्रकल्पांतर्गत लॉजिस्टिक्स आणि संबंधित  लाइट इंडस्ट्रीज, वेअरहाउसिंग, लॉजिस्टिक्स पार्क, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपो आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील.

सदर उपक्रम नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टीक पार्क म्हणून अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून कार्यक्षम, एकात्मिक आणि भविष्याभिमुख मालवाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यास चालना देणारा आहे. यासोबतच, सिडकोतर्फे एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि एंटरटेनमेंट अरेना यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक पायाभूत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत असून त्यामुळे या प्रदेशाचा एकूण विकास अधिक सक्षम होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पूरक पायाभूत सुविधांच्या बळावर हे सर्व प्रकल्प नवी मुंबईला एक सर्वसमावेशक शहरी व आर्थिक केंद्र म्हणून घडवतील, विकासाला गती देतील आणि शहराला नव्या उंचीवर नेतील.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली