पथनाटय स्पर्धेद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश  

नवी मुंबई : अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरमहाविद्यालयीन व्यसनविरोधी पथनाटÎ स्पर्धेत एस. आय. ई. एस. सिनिअर कॉलेज, नेरुळ यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. साहित्य मंदिर वाशी  येथे पार पडलेल्या  स्पर्धेत रायगड जिल्हा, नवी मुंबई, मुंबई इथल्या महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.  

या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावी संवाद, अभिनय आणि सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर ताकदीने मांडला. व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम, कुटुंबीयांचे होणारे हाल व समाजातील समस्या या सर्व गोष्टी पथनाट्यांद्वारे व्यक्त झाल्या. स्पर्धेचे परीक्षक अभिनेते प्रशांत निगडे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. दिग्दर्शिका वासंती भगत या दुसऱ्या परीक्षक होत्या.  

पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात अन्वयचे डॉ. अजित मगदूम यांनी पथनाट्यांचा दर्जा सुधारल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मराठी साहित्य संस्कृती कलामंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी,सहाय्यक पोलिस निरीक्षक ढवळे,  माँसाहेब मीनाताई ठाकरे महापालिका रुग्णालयाच्या सामाजिक विभागाच्या अधिकारी अश्विनी जानकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय तिळवे यांनी केले.

या उपक्रमाला नरोत्तम सकसेरिया फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी अन्वयचे सर्व समुपदेशक कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते, प्राध्यापक उपस्थित होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी तरुण पिढीने पुढाकार घेणे किती आवश्यक आहे याचा ठोस संदेश समाजात पोहचविल्याचे डॉ. अजित मगदूम यांनी सांगितले.  

स्पर्धेचा निकाल: एस. आय. ई. एस. सिनिअर कॉलेज, नेरुळ (प्रथम), अंजुमन-ए-इस्लाम, काळसेकर कॉलेज, पनवेल (द्वितीय), एस. आय. ई. एस. ज्युनिअर कॉलेज, नेरुळ (तृतीय), एफ. जी. नाईक कॉलेज, कोपरखैरणे (प्रथम उत्तेजनार्थ ), सेंट जोसेफ कॉलेज, विरार (द्वितीय उत्तेजनार्थ).

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी शहरात सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेराची नजर