खा. नरेश म्हस्के, किशोर पाटकर यांच्या मागणीला यश

नवी मुंबई : खासदार नरेश म्हस्के यांनी फेब्रुवारी महिन्यात वाशी येथे ‘खासदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात ‘सिडको'च्या धोकादायक आणि पुनर्विकास प्रक्रियेत गेलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया ‘सिडको'कडून सुरु करण्यात यावी. तसेच ‘सिडको'ची अभय योजना सुरु करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात नागरिकांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना पत्र देण्यात आले होते.

त्याअनुषंगाने १५ एप्रिल रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा संपर्कप्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हासंघटक सरोज पाटील, शीतलताई कचरे, युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे आदिंच्या शिष्टमंडळासह ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी ‘सिडको'च्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचे तसेच अभय योजना सुरु करण्याचे घोषित केले आहे. 

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारती आणि पुनर्विकास प्रक्रियेत गेलेल्या इमारतींना मागील ८ वर्षांपासून ‘सिडको'ने हस्तांतरण, ट्रान्सफर एनओसी आणि मॉर्गेज एनओसी देणे बंद केले आहे. त्यामुळे येथील लाखो गोरगरीब जनतेला गृहकर्ज, मुलांचे शिक्षण कर्ज किंवा लग्नकार्य यासाठी सदर घरांवर कर्ज घेता येत नव्हते. तसेच घर तारण ठेवता येत नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक १० वर्षाने ‘सिडको'च्या माध्यमातून अभय योजना सुरु करण्यात येत असते. मात्र, मागील १४ वर्षांपासून ‘सिडको'ने सदर योजना राबवलेली नसल्याने नवी मुंबईतील सुमारे १ लाख लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागल्याने तिचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. ‘सिडको'च्या आडमुठ्या धोरणामुळे गोरगरीब सदनिकाधारकांच्या आणि विविध मालमत्ता धारकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येत होती. त्यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर सातत्याने सिडको दरबारी पाठपुरावा करत होते. त्यांनी याबाबत सिडको प्रशासनाकडे निवेदन देखील दिले होते.

दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात खा. नरेश म्हस्के यांच्याकडे नागरिकांनी ‘सिडकोची घरे हस्तांतरण प्रक्रिया आणि अभय योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. सदर प्रक्रिया बंद असल्याने येथील नागरिकांच्या ‘सिडको'च्या या धोरणाविरोधातील भावना अतितीव्र झाल्या होत्या. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची भिती व्यक्त केली जात होती. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी खा.नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून सिडको व्यवस्थानाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला होता. याच विषयावर खा. नरेश म्हस्के यांनी शिवसेना शिष्टमंडळासह ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यावर सदर मागण्या तत्काळ स्वरुपात मान्य करुन त्वरित ‘सिडको'च्या धोकादायक आणि पुनर्विकास प्रक्रियेत गेलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया सुरु करणे आणि अभय योजना सुरु करण्यास सिडको व्यवस्थापनाने हिरवा कंदील दिला आहे. ‘सिडको'ने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडको सोडतधारक पोहोचले उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी