रस्ते दुरुस्ती कामांसाठी १५ मे पर्यंत डेडलाईन

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरु असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करुन सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महारपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना दिले.

पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरु असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी २८ मार्च रोजी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, ‘एमएमआरडीए'चे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, ‘मेट्रो'चे अधीक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण, आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, २ उड्डाणपुलांची कामे अशी सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत, असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

खड्डेमुक्त ठाणेसाठी सगळे प्रयत्नशील आहोत. दर १५ दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी. शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही ते पाहण्यास सांगितले असल्याचे आयुक्त राव यांनी म्हणाले.

पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलगतच्या सेवा रस्त्यावर सुरु असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कामाची त्याचबरोबर, कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरु असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जल वाहिनीच्या कामाची पाहणी करण्यात आली. सदर भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याबाबत तातडीने नियोजन करण्यास सांगण्यात आले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपूलच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे तसेच पातलीपाडा उड्डाणपुल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली उड्डाणपुलाखाली रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल, त्या खालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसर यांचीही पाहणी करण्यात आली.

उड्डाणपुलांसाठी डेडलाईन...
भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल १५ एप्रिलपर्यंत आणि कासारवडवली येथील उड्डाणपुल १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ‘एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर असलेल्या उंच सखलपणा पावसापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असेही त्यानी सांगितले. त्याचवेळी कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजुला असलेले ‘महावितरण'चे काम त्यांनी जलद स्थलांतरीत करण्यास सांगण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उत्तम प्रतिसाद