गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव'च्या उद्दिष्टपूर्तीचेच विसर्जन
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन; बेकायदा ‘पलेक्स-बॅनर्स'चा सुळसुळाट
नवी मुंबई : गणेशोत्सव २०२५ मध्ये नवी मुंबई महापालिका तर्फे लाखो रुपये खर्च करुन १४३ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीचेच विसर्जन दीड दिवसाच्या श्रीमूर्ती विसर्जन सोहळ्यातून दिसून आली आहे, असे ‘सजग नागरिक मंच, नवी मुंबई' या संघटनाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पर्यावरण जतन आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करणे बंधनकारक केले आहे. मात्र, सजग नागरिक मंच सदस्यांच्या निरीक्षणानुसार नवी मुंबई शहरात अगदी नाममात्र मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित झाल्या असून, बहुतांश विसर्जन थेट नैसर्गिक तलावातच झाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच महापालिकेने नियुक्त केलेले स्वयंसेवकच ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावात करुन न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करताना दिसले, असा दावा सजग नागरिक मंच सदस्यांनी केला आहे.
नवी मुंबईतील विविध नैसर्गिक तलावांवर महापालिकेने नेमलेले स्वयंसेवकच प्रत्यक्षात १-२ फुटांच्या गणेश मूर्ती नैसर्गिक तलावात विसर्जित करताना दिसून आले. सदर प्रकार केवळ महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचेच नव्हे तर न्यायालयाच्या आदेशाचा उघड अवमान आहे, असे सजग नागरिक मंच सदस्यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
महापालिका तर्फे अनेक ठिकाणी नैसर्गिक तलावांच्या शेजारीच कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. ‘अगदी बालवाडीत जाणारे मूलसुध्दा सांगेल की भक्त कोणत्या तलावात विसर्जन करेल'?, असा प्रश्न सजग नागरिक मंच सदस्यांनी उपस्थित केला आहे.
‘पलेक्स-बॅनर्स'चा सुळसुळाट
नवी मुंबई शहरामध्ये गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदा पलेक्स, बॅनर्स, पोस्टर्स यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. नवी मुंबई शहरातील प्रमुख चौक, फूटपाथ, सार्वजनिक इमारतींवर मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक जाहिराती झळकल्या आहेत. महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कारवाई शून्य टक्के राहिल्याचा आरोप सजग नागरिक मंच सदस्यांनी केला आहे.
महापालिका आयुक्त एसी केबिनमध्ये बसून कृत्रिम तलाव प्रयोग यशस्वी झाल्याचे आकडेवारीत सांगतात. पण, त्यांनी श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवशी किती तलावांना भेट दिली?, प्रत्यक्ष पाहणी करुन कोणते निर्देश दिले?, महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष किती तलाव पाहिले?, असे प्रश्न ‘सजग नागरिक मंच'चे अध्यक्ष सुधीर दाणी यांनी उपस्थित केले आहेत.
नवी मुंबई शहरात कृत्रिम तलाव निर्मितीसाठी झालेल्या सर्व खर्चाचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर तातडीने प्रसिध्द करावा, गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी जनजागृतीवर झालेल्या खर्चाचा तपशील जाहीर करावा, दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाचे कृत्रिम व नैसर्गिक तलावातील खरे आणि वास्तव आकडे सार्वजनिक करावे, १० दिवसांचा गणेशोत्सव संपण्याची वाट न पाहता नवी मुंबई शहरात लावलेले बेकायदा पलेक्स आणि बॅनर्स काढून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, कृत्रिम तलाव प्रकल्पाचा शासनस्तरीय आणि लोकलेखा समितीमार्फत ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा, नैसर्गिक तलावावर नियुक्त स्वयंसेवकांना सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावात करु न देण्यासाठी सक्त आदेश आणि जबाबदारी निश्चित करावी, आदी मागण्या ‘सजग नागरिक मंच'चे अध्यक्ष सुधीर दाणी यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.
‘नागरिक ऐकत नाहीत', असे कारण पुढे करुन नवी मुंबई महापालिका अधिकारी धृतराष्ट्र-गांधारीची भूमिका निभावतात, असा उपहास मंच सदस्यांनी केला आहे. ‘जर ‘नागरिक ऐकत नाहीत' असेच उत्तर द्यायचे होते तर कृत्रिम तलाव न बनवता ते उत्तर थेट न्यायालयालाच द्यायला हवे होते', असे मत मंच सदस्य ॲड. सुशांत जोशी यांनी व्यक्त केले.
उर्वरित गणेशोत्सव काळात महापालिका प्रशासनाने निष्क्रिय कार्यपध्दतीत बदल केला नाही, तर गणेश विसर्जनानंतर महापालिका आयुक्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांना ‘बांगड्यांचा आहेर' देऊन निषेध व्यक्त केला जाईल, असा इशाराही सजग नागरिक मंच तर्फे देण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, महापालिका प्रशासनाचे संविधानिक उत्तरदायित्व आहे. त्याला तिलांजली देण्याचा दिसून येणारा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियता अधोरेखित करणारा आहे. कृत्रिम तलावात विसर्जन या नियमाची उघड आणि सर्रासपणे पायमल्ली होत असेल तर मग महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन कृत्रिम तलावांची निर्मिती का केली?, याचे उत्तर प्रशासनाने करदात्या नागरिकांना देणे निकडीचे आहे. - रामचंद्र तुपे, सदस्य - सजग नागरिक मंच नवी मुंबई.