आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज -आयुक्त सागर

भिवंडी : येत्या पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा यानुषंगाने भिवंडी-निजामपूर शहर महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली शहरामध्ये कार्यरत विविध आस्थापना आणि कार्यान्वित यंत्रणांच्या प्रतिनिधींसोबत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये आयुक्त अनमोल सागर यांनी प्रामुख्याने धोकादायक इमारती, पूर परिस्थती निर्माण होणाऱ्या क्षेत्राचा आढावा, नागरिकांना स्थलांतरीत करावयाची वेळ आल्यास त्याची पर्यायी व्यवस्था, त्यांना लागणाऱ्या जेवणाची पाकिटे, आवश्यक सुविधांची तयारी, नालेसफाई, पाणी साचून त्यामध्ये जर विद्युत प्रवाह प्रवाहित झाला तर करावयाची तातडीची उपाययोजना, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना, पावसाळ्यामध्ये उद्‌भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाची तयारी, शहरामध्ये पावसाळ्यात कचरा साठून दुर्गंधी आणि रोगराई पसरु नये याकरिता आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या कायर्वाहीचा आढावा, शहरामध्ये विविध यंत्रणांकडून सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

आढावा बैठकीमध्ये आयुक्त सागर यांनी महापालिकेच्या बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या यंत्रणांकडून सुरु असलेली रस्त्याची विकास कामे कोणत्याही परिस्थितीत मॉन्सूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस विभागाने देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर आणि मुख्यालयस्तरावर २४े७ मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. पुढील ४ महिने कोणीही रजेवर जाऊ नये. मुख्यालय सोडण्यापूर्वी आयुक्तांची परवानगी घेण्यात यावी. प्रभाग कार्यालय, मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व दूरध्वनी क्रमांक सुरु आहेत आणि पुढील सर्व काळ सुरु राहतील, याची खबरदारी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थतीमध्ये दूरवनी बंद राहता कामा नये. वैद्यकीय आरोग्य विभागाने आपत्कालीन परिस्थतीसाठी आपत्कालीन कक्ष सुरु करावा. सर्व प्रकारच्या साथीचे आजार, अपघात घडल्यास त्यावर आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा. जेणेकरुन ऐनवेळी औषधे कमी पडणार नाहीत, असे आयुवतांनी सूचित केले.

जर एखाद्या ठिकाणी पाणी साचुन त्या ठिकाणी विद्युत प्रवाह पाण्यात प्रवाहित झाल्यास टोरेंट कंपनीने तातडीने कारवाई करुन सदर भागातील विद्युत पुरवठा बंद करावा. वृक्ष अधिकारी यांनी शहरातील सर्व वृक्षांच्या धोकादायक फांद्याच्या छाटणी करावी. तसेच ज्या वृक्षांच्या फांद्या विद्युत प्रवाहाला अडथळा ठरत असतील, त्यांची तातडीने छाटणी करावी. अग्निशमन विभागाने बोटी, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. जनसंपर्क विभागाने शहरामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करु नये, याची जनजागृती करण्यात यावी. सर्व महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक प्रसिध्द करावेत. आपत्कालीन परिस्थतीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन नागरिकांनी माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आयुवत सागर यांनी सांगितले.

सदर बैठकीस अति. आयुक्त (१) देविदास पवार, अति. आयुक्त (२) वि्ील डाके, सहायक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, उपायुक्त (मार्केट) बाळकृष्ण क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, पोलीस विभाग, टोरेंट पॉवर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरामध्ये २७ ठिकाणी पूर परिस्थती निर्माण होणाऱ्या स्थानांची यादी निश्चित केली आहे. या ठिकाणी जर पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जवळपासच्या समाज कार्यालय, शाळा येथे नागरिकांना स्थलांतरीत करुन त्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करावी. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी या पुढील काळामध्ये एकमेकांशी सातत्याने समन्वय साधून आपले कर्तव्य पार पाडावे.
-अनमोल सागर, आयुक्त -भिवंडी महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मालमत्ता विभागात गैरमार्गाने मनमर्जी कारभार