कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील भिकारी व गर्दुल्यांना हटवले

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या फोर कोर्ट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या भिकारी व गर्दुल्यांवर सिडकोच्या सुरक्षा विभागाने कारवाई करुन या परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या सर्व भिकारी व गर्दुल्यांना हटविण्यात आले. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात येऊन स्थानक परिसर पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुला आणि स्वच्छ बनविण्यात आला आहे.  

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या नोडल बाजूला असलेल्या फोरकोर्ट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भिकारी व गर्दुले यांचा ठिय्या पडल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. स्थानक परिसरात दुर्गंधी, घाण, उघड्यावर स्वयंपाक व झोपेची ठिकाणे यामुळे केवळ अस्वच्छता नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. सिडको सुरक्षा विभागाकडे प्रवाशांकडून त्याबाबत अनेक तक्रारी प्राफ्त झाल्या होत्या.  

या पार्श्वभूमीवर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको सुरक्षा विभागाने शुक्रवारी कोपरखैरणे रेल्वे परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान फोर कोर्ट परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या सर्व भिकारी व गर्दुल्यांना हटविण्यात आले. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात येऊन स्थानक परिसर पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुला आणि स्वच्छ बनविण्यात आला आहे.  

सिडकोच्या या तत्पर कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रवाशांनी आता येण्या-जाण्यास अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण झाले असून दुर्गंधीपासूनही दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

सुरेश मेंगडे  (मुख्य दक्षता अधिकारी सिडको)  

रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण करणाऱयांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. या पुढील काळात रेल्वे स्थानक आवारातील भिकारी व गर्दुल्यांवर सतत देखरेख ठेवून आवश्यकतेनुसार तात्काळ कारवाई केली जाईल.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त  34,500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर