पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट  

गृहविभागाच्या अविकसित भूखंडांची काही जागा विकून निधी उभारण्यावर विचार विनिमय

नवी मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल तर मुंबईसह एमएमआर क्षेत्रात विकासाअभावी पडून असलेल्या गृह विभागाच्या भूखंडांपैकी काही क्षेत्राची विक्री करुन उपलब्ध होणाऱया निधीतून म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून अन्यथा पोलिस गृहनिर्माण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पोलिसांकरिता घरे उभारता येणे शक्य आहे. यावर वरिष्ठ पातळीवर विचार होणे आवश्यक आहे. पोलिसांना चांगली घरे मिळाली पाहिजेत, त्यांचे राहणीमान उंचावले पाहिजे, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सुतोवाच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईत केले.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी पोलीस पाल्यांसाठी नेरुळ येथील आगरी कोळी भवनमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस इमारतींच्या दुरुस्तीसाठी फंड देणे, पोलिसांना कमी व्याजदरामध्ये अथवा सबसीडी देण्याचा तसेच ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरु असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.  

पोलिसाच्या मुलाने पोलिसच बनले पाहिजे असे काही नाही. पोलिसांवर मानसिक, शारीरिक तणाव कायम असतो. त्यामुळे त्यांच्या मुलांनी रोजगारासाठी दुसरा पर्याय निवडल्यास गैर काही नाही. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पोलिस पाल्यांसाठी  रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याचा नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा उपक्रम स्तुत्य असून त्यांनी पोलिस दलासाठी एक आदर्श घालून दिला आहे. अशाप्रकारचे रोजगार मेळावे राज्यातील अन्य पोलिस आयुक्तालयाने व जिल्हा पातळीवर पोलीस अधिक्षकांना आयोजित करण्याच्या सूचना देणार असल्याचे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलिस आयुक्त संजयसिंह येनपुरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त दिपक साकोरे, रोजगार मेळाव्याचे आयोजक तथा पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे, अमित काळे, रश्मी नांदेडकर व प्रशांत मोहिते आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या मेळाव्या मागचा उद्देश विषद करुन या मेळाव्यात नोकरी मिळालेल्या पोलीस पाल्यांनी आपली क्षमता आणि स्किल वाढवून आपण उत्तरोत्तर कशी प्रगती करू शकतो यासाठी नेहमीच प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. तर या मेळाव्यात 100 कंपन्यांच्या माध्यमातून 2 हजार 600 पोलीस पाल्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.  

नवी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्याला लवकरच मंजुरी
या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्यापूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने गृह विभागास सादर केलेल्या विविध प्रस्तावांवर चर्चा केली. यामध्ये नवी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्यासह अन्य पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव, परिमंडळ-3 च्या निर्मितीचा प्रस्ताव, पोलिस आयुक्तालयाच्या हद्द वाढीचा व पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुर्नरचना करण्यासोबतच मनुष्यबळ वाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठकीचे आयोजन करुन निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.  

या रोजगार मेळाव्यात 2600 पोलीस पाल्यांनी नोंदणी केली असून त्या सर्वांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळणार असल्याने पोलिस पाल्यांना त्याचा आधार मिळणार असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितले.  

चॅट बोट सेवेचा शुभारंभ  
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी चॅट बोट सेवा सुरू केली आहे. या चॅट बोटचं उद्घाटन यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. चॅट बोट सेवा सुरु करणारे नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हे राज्यातील पहिले पोलिस आयुक्तालय ठरले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे