‘ठाणे'ची मामलेदार मिसळ इतिहासजमा

ठाणे : राज्यातील राजकारणी, कलावंत यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ठाणेमधील प्रसिध्द माललेदार मिसळ आता इतिहासजमा झाली आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या मिसळीच्या दुकानावर अखेर हातोडा पडला आहे. तहसीलदार कार्यालयासह विविध सरकारी कार्यालयांच्या  पुनर्विकासाचे काम जोरात सुरु आहे. त्यात अडसर ठरणारे दुकानही आता नामशेष झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे ते थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत या मिसळीचा गवगवा होता. अभिषेक बच्चनला मामलेदार मिसळ आवडत असल्याने अनेकदा बच्चन कुटुंबियांच्या नाष्ट्यामध्ये या मिसळीचा समावेश असायचा. आता या साऱ्या आठवणीच शिल्लक राहणार आहेत. मुळचे कारवारचे मुर्डेश्वर मामा यांनी या मिसळची चव ठाणेकरांसह राज्याला लावली. १९५० च्या दशकात मामलेदार अर्थात तहसीलदार कार्यालय परिसरात छोट्याशा हॉटेलात या मिसळचा जन्म झाला. ‘मामलेदार मिसळ' ज्या जुन्या वास्तुतून साऱ्यांच्या जिभेवर राज्य करत होती, ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे सदर प्रसिध्द ठिकाण पाडण्यात आले असून, यामुळे ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. जरी मिसळ आता शेजारील दुसऱ्या वास्तुत स्थलांतरीत झाली असली तरी त्या जुन्या लाकडी बाकड्यांच्या आणि रांगांच्या आठवणी मात्र आता केवळ इतिहासात जमा झाल्या आहेत.

साधी बैठक व्यवस्था आणि झणझणीत चवीचा ‘कट' हीच या ब्रँडची खरी ताकद राहिली. आज याठिकाणी नवी इमारत उभी राहणार असली, तरी जुन्या वास्तुने दिलेली ती आपुलकीची चव ठाणेकर नक्कीच मिस करतील. दरम्यान, या पाडलेल्या वास्तुचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर ‘मामलेदार'च्या ग्राहकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे बसून मिसळवर ताव मारण्याची मज्जाच वेगळी होती. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी... असे अनेकांनी म्हटले आहे.

राजकारणी अन्‌ मिसळ...
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, नारायण राणे, बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ठाणे शहरात सभा असल्यावर हमखास मामलेदार मिसळ मधून मध्यम आणि तिखट मिसळ जायची. राज ठाकरे तर सहकुटुंब खास या दुकानात येऊन मिसळ खात असत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली