खड्डेमय रस्त्यांमुळे रिक्षा चालकांचा एल्गार
अंबरनाथ : शहरातील खड्डे, अपूर्ण गटारे आणि इतर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या जोशींकाका-रामदास पाटील रिक्षा चालक-मालक संघटनाने २० जून रोजी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
यावेली शेकडो रिक्षा चालकांनी नगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. अखेर नगरपालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले.
यापूर्वी संघटनेने खड्डे, अपूर्ण गटारे, वाढलेल्या फांद्या आणि रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणाबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच मागण्या मान्य न झाल्यास १६ जून पासून बेमुदत रिक्षा बंदचा इशारा दिला होता. प्रशासनाने समस्यांवर अद्याप उपाययोजना न केल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उपमुख्याधिकारी उमेश राऊत आणि शहर अभियंता राजेश तडवी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यानुसार खड्डे भरण्यासाठी शासनाकडे एकत्रित प्रस्ताव सादर केला जाईल आणि २१ जूनपासून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम सुरु होईल, असे सांगण्यात आले.