उरण मधील डोंगरात आगीचा डोंब
उरण : उरण तालुक्यातील इंद्रायणी टेकडीवर तसेच वन खात्याच्या डोंगरात आगीचा भडका उडण्याची घटना ९ मार्च रोजी रात्रीच्या अंधारात घडली आहे. या घटनेकडे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने डोंगरातील सुक्ष्म जीव, पशुपक्षी, वन प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वन विभागाच्या सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे असुरक्षित झालेले उरले सुरलेले वन क्षेत्र या आगीने भस्मसात होण्याच्या मार्गावर आहेत.
९ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी टेकडीवर तसेच कळंबुसरे, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील वन विभागात आगीचे लोट दिसू लागल्याने काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, या ठिकाणावरील आगीची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी जाणे टाळले. परिणामी, आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे शेकडो लहान मोठी झाडे भस्मस्थानी पडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सुक्ष्म जीव पशुपक्षी आणि वन प्राणी होरपळून मृत्युमुखी पडल्याची माहिती पर्यावरण प्रेमींकडून मिळत आहे.
सध्या उरण तालुक्यातील अनेक डोंगर वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे डोंगर, टेकऱ्या काळवंडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील डोंगर, टेकड्या वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.