सानपाडा बस स्थानक समस्यांच्या विळख्यात
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे सातत्याने राबवण्यात येत आहेत. मात्र, महापालिका आणि सिडको प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सानपाडा रेल्वे स्थानक बाहेरील सानपाडा बस स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे, असे निर्दशनास आणून, ‘सानपाडा बस स्थानकाच्या मुख्य आवाराची डागडुजी करुन सानपाडा बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेहमीच नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देण्याचा प्राधान्याने विचार केला आहे. नवी मुंबई शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या बाहेरील बस थांबे अत्यंत सुशोभित आणि सुविधापूर्ण उभारण्यात आले आहेत. परंतु, याला सानपाडा रेल्वे स्थानक जवळील सानपाडा बस थांबा अपवाद ठरत आहे. सानपाडा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकातून एपीएमसी मार्केट मध्ये जाणारे शेकडो ग्राहक, हजारो रहिवाशी आणि शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करीत असतात. परंतु, अत्यंत गजबजलेले आणि रहदारीचे ठिकाण असून देखील सानपाडा बस स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. सानपाडा बस स्थानकातील उद्यानाची दुर्दशा झाली आहे. सानपाडा बस स्थानक नामफलक देखील तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. महापालिका परिवहन उपक्रम तर्फे सानपाडा बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे आढळून येत नाही. याशिवाय बस स्थानकामध्ये असलेले सर्व पदपथ गेली एक ते दोन दशके जैसे थे तैसे तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी महापालिका आणि सिडको प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सानपाडा बस स्थानकाच्या मुख्य आवाराची डागडुजी करुन स्थानकातील विद्युत दिवे आणि पंखे सुव्यवस्थित करावेत, बस स्थानकाच्या आवारात असलेले वाहक- चालक विश्राम केंद्र आणि प्रवाशी मार्गदर्शन केंद्र सुस्थितीत, सुविधापूर्ण करावे, स्थानकाच्या आवारात प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करावी, बसस्थानके स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, बसस्थानक आणि परिसराची दैनंदिन स्वच्छता करुन सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करावे, बस स्थानकाच्या आवारात असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे, आदी मागण्या सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी महापालिका आणि सिडको प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ होण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेहमीच नागरिकांना चांगल्या प्रवाशी सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहते.मात्र, या सुविधांना सानपाडा बस स्थानक अपवाद आहे. त्यामुळेच सानपाडा बस स्थानकात प्रवाशांना दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे केली आहे. या मागणीची लवकरात लवकर पुर्तता होईल, अशी अपेक्षा आहे. - निलेश सोमाजी कचरे, सामाजिक कार्यकर्ते - सानपाडा, नवी मुंबई.