गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा -ना. गणेश नाईक
ठाणे: गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा ‘पालघर'चे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नामदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २२ ऑगस्ट रोजी ठाणे मधील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार पार पडला. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी विविध विषयांवरील २०० पेक्षा अधिक निवेदने सादर केली. यापैकी बहुतांश निवेदनांवर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांवर समयबध्दरित्या कार्यवाही करण्यात येणार आहे.
ठाणेतील आजचा तिसरा जनता दरबार होता. नागरी समस्या, प्रशासनाकडून झालेला अन्याय, विविध घटकांच्या प्रलंबित मागण्या, याविषयीची निवेदने नागरिकांनी सादर केली. माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपेे, ठाणे भाजपा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महानगर गॅस, पोलीस, वने, आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोडबंदर मार्ग आणि ठाणेतील अन्य ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांचा मुद्दा जनता दरबारात उपस्थित झाला. वाहनांची संख्या वाढली; परंतु रस्त्यांची क्षमता पूर्वीसारखीच असल्याने रस्ते खराब झाले आहेत. घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे, असे सांगून नवीन रस्ते तयार करण्यात येत असल्याचे ना. नाईक म्हणाले. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘राज्य रस्ते विकास महामंडळ'च्या अधिकाऱ्यांना दिले.
शहरांमध्ये नागरीकरण आणि लोकसंख्या, त्याचबरोबर वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे उन्नत मार्गांची उभारणी करुन या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणेतील काही पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये लाभार्थी रहिवाशांना घरे मिळाली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर चौकशी करुन संबंधित तक्रारदारांना घरे देण्याचे आदेश ना. गणेश नाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
दुसरीकडे ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात महापालिकेने कृत्रिम तलावासाठी खड्डा खणलेला आहे. या कृत्रिम तलावामुळे कोळी समाजाची पूर्वापार चालत आलेली प्रथा मोडीत निघणार आहे. त्याचबरोबर या कृत्रिम तलावामुळे विसर्जनातही अडथळे निर्माण होणार आहेत.त् यामुळे अष्टविनायक चौकाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरावर विसर्जनाची सोय करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्यावर भाविकांना सोयीस्कर आणि विसर्जनाचे पावित्र्य राहील अशा पध्दतीने विसर्जनासाठी आरसीसी पध्दतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची सूचना नामदार नाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.