वाशी येथे मॉक ड्रिल उत्साहात संपन्न
नवी मुंबई : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे ‘ऑपरेशन अभ्यास' ‘मॉक ड्रिल' १३ मे रोजी वाशी, सेवटर-१२ मधील नीलसिध्दी टॉवरच्या प्रांगणात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी सायंकाळी ४.३० वाजता सायरन वाजवून ‘मॉक ड्रिल'ची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व प्रात्यक्षिके अत्यंत प्रभावीपणे सादर केली.
जिल्हाधिकारी तथा ‘नागरी संरक्षण दल'चे नियंत्रक अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ‘नागरी संरक्षण दल'चे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसिलदार उमेश पाटील, फडतरे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक अयुब शिकलगार, जगीर खान, शकुंतला राय, बुध्ददास जाधव, अरुण सातपुते, प्रमोदिनी जाधव, भुजबळ, मानसेवी निदेशक डॉ. प्रकाश ठमके यांच्या सक्रिय पुढाकारातून ‘मॉक ड्रिल' आयोजित करण्यात आले होते.
‘मॉक ड्रिल' दरम्यान, काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक, बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी त्वरित सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून २० जखमी नागरिकांना तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. इमारतीत अडकलेल्या अन्य ५ नागरिकांची ‘अग्निशमन दल'च्या सहाय्याने सुटका करण्यात आली आणि त्यांना प्रथमोपचार पुरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यवाही दरम्यान, सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने सहभाग घेत केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. ‘मॉक ड्रिल' दरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
या ‘मॉक ड्रिल' वेळी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त सोमनाथ पोटरे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, वाशी सहाय्यक आयुक्त अलका महापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, श्री.साळवी, नवी मुंबई विशेष शाखेचे चंद्रशेखर वक्ते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच नीलसिध्दी टॉवरचे अध्यक्ष राजू अहुजा, सचिव जसजित मुंडे, विनोद बाफना, शिल्पा आराेंदेकर, आदि उपस्थित होते.
एकंदरीतच ‘मॉक ड्रिल' वाशी शहरात अत्यंत यशस्वीरित्या पार पडले. यातून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची आणि नागरिकांची सज्जता प्रभावी असल्याचे दिसून आले.